वसई : वसई - विरार महापालिकेच्या स्थायी तसेच परिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक बुधवारी पालिका सभागृहात पार पडली. या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या. स्थायी समिती सभापतीपदी बहुजन विकास आघाडीचे विरार मनवेलपाडा येथील ज्येष्ठ नगरसेवक प्रशांत राऊत यांची तर परिवहन सभापतीपदी प्रीतेश पाटील यांची फेरनिवड झाली आहे.महापालिकेची अत्यंत महत्त्वाची समिती असलेल्या स्थायी समिती सभापतींची निवडणूक बुधवारी सकाळी मुंबईचे जिल्हाधिकारी (उपनगर) आणि पिठासीन अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या पदासाठी बविआकडून नगरसेवक प्रशांत राऊत यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज आला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे आधीच स्पष्ट झाले होते. केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. आ. हितेंद्र ठाकूर यांनी सोपविलेल्या जबाबदारीला माझा पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असे प्रशांत राऊत यांनी यावेळी सांगितले.बविआचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच नगरसेवक उपस्थितवसई : वसई - विरार महापालिकेच्या परिवहन समितीच्या सभापती पदासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता पीठासीन अधिकारी अणि मुंबई जिल्हाधिकारी (उपनगर) मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पालिका सभागृहात पार पडली. यावेळी एकमेव अर्ज दाखल करणारे बविआचे उमेदवार प्रीतेश पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी यांनी घोषित केले.दरम्यान, सोमवार, १९ आॅगस्ट रोजी दुपारपर्यंत सत्ताधारी बविआकडून एकच नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते.यावेळी नवनिर्वाचित सभापती प्रीतेश पाटील यांची फेरिनवड झाल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे तसेच पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
प्रशांत राऊत स्थायीचे तर प्रीतेश पाटील परिवहनचे सभापती; सत्ताधारी तसेच विरोधकांकडून अभिनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:29 PM