वसई : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी प्रवीण शेट्टी यांची बिनविरोध निवड झाली आहे. शुक्रवारी पालिका सभागृहात महापौर पदाची ही निवडणूक संपन्न झाली.माजी महापौर रुपेश जाधव यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी १९ आॅगस्ट रोजी केवळ एकच नामनिर्देशन अर्ज आला. त्यामुळे शुक्रवारी महापौरपदी बिनविरोध निवड होणार हे चित्र त्याचवेळी स्पष्ट झाले होते. या निवडणुकीसाठी सभागृहात पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, वसईचे प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अति. आयुक्त रमेश मनाले, माजी महापौर प्रवीणा ठाकूर, पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कोण आहेत नवनिर्वाचित महापौर प्रवीण शेट्टीमूळचे मँगलोरियन अर्थात दक्षिण भारतीय, परंतु जन्मजात वसईकर असलेले प्रवीण शेट्टी हे वडिलोपार्जित हॉटेल व्यावसायिक असून शांत, संयमी आणि मितभाषी असे व्यक्तिमत्व म्हणूण त्यांची वसई परिसरामध्ये ओळख आहे. वसई सहित होळी, नवघर आदी भागात त्यांची हॉटेल व रेस्टॉरंटही कार्यरत आहेत.वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली आणि याच काळात त्यांनी विविध विद्यार्थी संघटना तसेच विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. निष्ठावंत, सरळमार्गी आणि लो-प्रोफाईल कार्यकर्ता म्हणून त्यांची बविआ पक्षात ओळख आहे.राजकीय, सामाजिक कारकीर्द : १९९१ पासून वसई नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून निवडून येत पुढे महापालिका काळातही त्यांचे विजयाचे सातत्य कायम राहिले. नगरपरिषद काळात त्यांनी वसईचे उपनगराध्यक्षपदही भूषवले असून प्रभाग समितीचे ते कालपर्यंत विद्यमान सभापती म्हणून कार्यरत होते. ही त्यांची चौथी टर्म होती.
प्रवीण शेट्टी वसई - विरारचे नवे महापौर; प्रथमच दक्षिण भारतीय चेहऱ्याला मिळाली पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:28 AM