वसई : म्हैसाळ येथील घटनेनंतर राज्य सरकारने गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्हयात येत्या महिनाभर सोनोग्राफी सेंटर, दवाखाने आणि हॉस्पीटलची तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी दोषी आढळणाऱ्या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. मुलींचे घटते प्रमाण आणि लिंग गुणोत्तर प्रमाण रोखण्यासाठी पालघर जिल्हयात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, आरोग्य विभाग आणि अन्न व औैषध प्रशासन विभागाचे एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जिल्हयातील सोनोग्राफी सेंटर, हॉस्पीटल आणि दवाखान्यांची तपासणी करणार आहे. यात लिंग निदान चाचणी आणि बेकायदेशीरपणे गर्भपात करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी कारवाई करणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक कांचन वानेरे यांनी दिली. गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्ण निदान तंत्र अधिनियम १९९४ कायदा अंतर्गत जिल्ह्यात कोणत्याही नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रातील डॉक्टर किंवा अन्य कुणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सदर कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती देणाऱ्याला त्याचे नाव गुप्त ठेऊन २५ हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. (वार्ताहर)
गर्भलिंग निदान प्रतिबंधक मोहीम
By admin | Published: March 16, 2017 2:43 AM