वसई : मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटींग सुरु असतानाच वसई-विरारला ही मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. वसई पूर्वेकडील मिठागरात मिठागरात ४०० जण अडकले होते. त्यातील अनेकांना अग्निशमन दलाच्या मदतीने बोटीमधून बाहेर काढण्याचे काम चालू केले आहे.
वसईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी गेले होते. हे अधिकारी परतत असताना हॉटेल ग्रीन या ठिकाणी एका गरोदर महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळेच महिलेला रुग्णालयात दाखल करणे अत्यंत गरजेचे होते. अग्निशमन दलाने होडीच्या मदतीने महिलेला रूग्णालयात पोहचवले. आशा जीवन डिसूजा असे या महिलेचे नाव असून त्या वसईतील मथुरा इमारतीत राहतात.
माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत गणपती मंदिराच्या बाजूला असणाऱ्या गार्डनमध्ये काम करणारे १० लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस यांनी त्या सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. यामध्ये आसाराम कोळेकर, सुमन कोळेकर, विनोद जगताप आणि त्यांची पत्नी, कैलास आणि इतर लहान मुले यांचा समावेश आहे.