वसई : वसई विरार परिसरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीं आगमनाला सुरुवात झाली आहे. रात्रीच्या वेळी वाजतगाजत गणेश मूर्ती मंडपात येऊ लागल्या आहेत. तर मूर्ती कारखान्यातील कारागीर मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहे. यंदा गणेश मूर्तींच्या दरात वाढ झालेली असली तरी मागणीही वाढल्याने मूर्तीकार आंनदात आहेत. विशेष म्हणजे यंदा विरारमध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्तीची मागणी वाढली असल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे.गणेशाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असताना गणेश कारखान्यातील धावपळ वाढली आहे. वसई विरार परिसरात घरगुती आणि सार्वजनिक मंडळांची मिळून ३० हजारांहून अधिक गणेश मूर्तीं विराजमान होताता. त्यामुळे वसई विरार परिसरात दोनशेच्या घरात मूर्तीचे कारखाने थाटले गेले आहेत. प्रत्येक कारखानतून किमान दीडशे गणेश मूर्तींची मागणी असल्याचे मूर्तीकार सांगतात. वसईत पेणहून कच्च्या मूर्ती आणून रंगरंगोटी करून सजावण्यात येतात. गेल्या तीन महिन्यांपासून येथील कारखानंमध्ये दिवस-रात्र कामे सुरु असून आता गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे. यंदा बाजीराव पेशवे आणि जय मल्हार गणेश मूर्तींची मागणी जास्त असून दगडू शेठ हलवाई, लालबागचा राजा, चिंंतामणी गणेश, सिद्धीविनाक , टिटवाळा गणेश मूर्तींनाही चांगली मागणी आहे. कच्च्या मूर्ती, वाहतूक, कलर, कच्चा माल आणि जागेच्या दरात वाढ झाल्याने यंदा मूर्तींचे दरही वाढले आहेत. दीड फूटांच्या मूर्तीचे दर चारशे ते पाचशे रुपयांनी वाढले आहेत. दीड फूटाची मूर्ती साधारण अठराशे रुपयांना विकली जात आहे. त्यापुढे फूटामागे हजार ते दोन हजार रुपयांची वाढ झालेली आहे. बहुतेक कारखान्यांमध्ये पाच फूट उंचीच्या मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. तसेच मागणी नुसार अधिक उंचीच्या मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. मूर्तींचे दर वाढले असले तरी खरेदीदार यंदा वाढले असल्याने मूर्तीकार आनंदात आहेत.दरम्यान, काल रात्रीपासून वसईतील सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे वाजतगाजत आगमन होऊ लागले आहे. दिवसभर असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मंडळांनी रात्री उशिरा मूर्ती आणण्याची शक्कल लढवली आहे. एकीकडे कारखान्यांमध्ये गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरत असतांना सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप आणि घरांमध्ये गणेशाच्या आगमनाची तयारी जोरात सुरु आहे. देखावे आणि सजावटीच्या कामांनी वेग घेतला आहे. (प्रतिनिधी)
गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू
By admin | Published: September 01, 2016 2:44 AM