वसई : वसई तालुक्यातील २८५ सार्वजनिक आणि ३ हजार ७३६ घरगुती गणेशांचे गुरुवारी विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी वसई विरार पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.वसईत बाप्पाला दरवर्षी वाजत-गाजत, गुलाल उधळत मोठ्या मिरवणुकीने निरोप दिला जातो. डीजे, ढोल-ताशा, बँडबाजासह भव्य मिरवणुका काढल्या जातात. त्याच जल्लोषात गुरुवारी सर्वाधिक २८५ सार्वजनिक गणेशाचे विसर्जन होत असल्याने वसईतील सर्व रस्ते गर्दीने ओसंडून वाहतील. वाजतगाजत, नाचत मिरवणुका निघत असल्याने विसर्जनालाही वेळ लागतो. तालुक्यातील ८४ तलावे आणि १२ समुद्रकिनारी विसर्जनासाठी पालिकेने तयारी केली आहे. त्याठिकाणी विजेची व्यवस्था, तरफे, होड्या, पट्टीचे पोहणारे कार्यकर्ते यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाप्पाच्या निरोपाच्या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. यावेळी सोळाशेहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीसाठी १२ वाजेर्पंतची वेळ देण्यात आलेली आहे. त्या वेळेत मिरवणुका संपतीलच याकडे पोलिसांचे लक्ष असणार आहे. वेळेचे बंधन पाळण्यासोबतच आवाजाची मर्यादा ओलांडली जाणार नाही. याकडेही पोलीस लक्ष ठेऊन असणार आहेत. तुळींज पोलिसांनी वेळ आणि आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्या तब्बल आठ मंडळांवर कारवाई केली आहे. शेवटच्या दिवशी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवरही कारवाईचा बडगा उगारणत येणार आहे. (प्रतिनिधी)अंबाडी रोडवर मुख्य रस्ता अडवून बांधण्यात आलेल्या मंडपामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत एका मोटारसाकल स्वाराचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यु झाला. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली.नवघर-माणिकपूर शहरात अंबाडी रोडवर रस्ता अडवून विश्वभारती फ्रुट विक्रेता संघाने गणेशोत्सवासाठी मंडप टाकला आहे. त्यामुळे दुपारी वाहतूक कोंडी झाली. त्यावेळी अॅक्टीव्हावरून जाणाऱ्या नवीनचंद्र शाह यांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून मंडळावरही कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.अशी आहे पालघर पोलिसांची सज्जतापालघर पोलीस अधीक्षक कार्यालया अंतर्गत ५ उपविभागीय स्टेशन असून बोईसर स्टेशन अंतर्गत ३७ सार्वजनिक तर मूर्त्यांचे विसर्जन उदया होणार आहे. डहाणू उपविभागीय स्टेशन अंतर्गत ३० सार्वजनिक तर ८ घरगुती मूर्त्या, जव्हार उपविभागीय स्टेशन अंतर्गत सार्वजनिक १४१ तर घरगुती २९९ मूर्त्या,पालघर उपविभागीय स्टेशन अंतर्गत सार्वजनिक ७४ तर घरगुती १४२ मूर्त्या तर वसई उपविभागीय स्टेशन अंतर्गत सर्वात जास्त सार्वजनिक २८५ तर खाजगी ३ हजार ७१६ अशा एकूण ४ हजार ८५९ मूर्त्यांचे विसर्जन उद्या होणार आहे.प्रत्येक मूर्त्यांसोबतचे ढोलताशेवाले व त्यावर जल्लोष करणाऱ्यांना नियंत्रणात ठेवण्याची दक्षता घेण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांच्या मार्गदर्शना खाली २ अप्पर अधीक्षक, ५ उपविभागीय अधिकारी, १२३ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक, ८३६ पोलीस कर्मचारी, ३५० होमगार्ड, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुठेही अनुचित प्रकार घडल्यास राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या,दंगल नियंत्रण पथकाच्या दोन प्लॅटून्स, दोन शीघ्र कृती दल पथके हि तैनात आहेत.
बाप्पांच्या विसर्जनासाठी तयारी जय्यत!
By admin | Published: September 15, 2016 2:13 AM