डहाणू : नगर परिषदेसाठीचे मतदान रविवारी १७ डिसेबर रोजी होत असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.५२ हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात ३२ हजार मतदार आहेत. यावेळी नगराध्यक्ष निवडणूक थेट पद्धतीने होत असून एकूण २५ नगरसेवकांसाठी मतदान होणार आहे. तर नगराध्यक्षपदासाठी एकूण ७ उमेदवारात लढत आहे.नगराध्यक्षपदासाठी भरत राजपूत (भाजप), मिहीर शाह (राष्ट्रवादी काँग्रेस), संतोष शेट्टी (शिवसेना) अशोक माळी (काँग्रेस), दिलीप वळवी (बविआ) तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. अमित नहार (अपक्ष) अनिल पष्टे (अपक्ष) अशा एकूण ७ उमेदवारांमध्ये निवडणूक होत आहे. तर नगरसेवकपदाच्या २५ जागांसाठी १०९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आँचल गोयल आहेत.डहाणू कम्युनिटी हॉल येथे १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी ४६ मतदानकेंद्रावर झोनल ७, केद्राध्यक्ष ५०, अधिकारी १५, शिपाई ५० यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान आज निर्भयपणे आणि शांततेत मतदान पार पडावे यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून १८० पोलीस, आरसीपीच्या ३ प्लॅटून्स, १२ उपनिरिक्षक, १ पोलीस निरीक्षक आणि १ उपविभागीय पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर लावला असून मतदार कोणाला कौल देतात याचा फैसला सोमवारी दुपारपर्यंत होणार आहे.
नगर परिषद निवडणुकीसाठी डहाणूत यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 3:33 AM