पालघर : माहीम येथील एका १५ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर नऊ नराधम तरुणांनी अठरा तास आळीपाळीने बलात्कार केल्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले असताना काही स्थानिक राजकीय नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी यांनी हे प्रयत्न उधळून लावले आहेत. माजी उपसरपंच असलेल्या व्यक्तीने काही हजार रुपयांचे आमिष पीडित मुलीच्या वडिलांना दाखवून ही केस मागे घेण्याबाबत धमकावल्यावर त्या पदाधिकाऱ्याला दिवसभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले.
पालघर तालुक्यातील माहीममध्ये घडलेल्या अश्लाघ्य प्रकरणाचे गंभीर पडसाद देशभर उमटले आहेत. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. पालघर पोलिसांनी या प्रकरणातील नवव्या आरोपीला अटक केली असून सर्व आरोपींना गुरुवारी पुन्हा एकदा पालघर न्यायालयात हजर केले जाणार आहे. हे आरोपी स्थानिक तरुण असल्याने त्यांना वाचविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी एका माजी उपसरपंचाने पीडित मुलीच्या वडिलांना काही हजार रुपयांचे आमिष दाखवून धमकावल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी पाडवी यांनी संबंधित उपसरपंचाला दिवसभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. पोलिसांवर वेगवेगळ्या पद्धतीने मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असतानाही पोलिसांनी पॉक्सो, अपहरण आदीसह आठ विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेत सुमोटो दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी या प्रकाराने पालकांची जबाबदारी वाढल्याचे सांगून आपला मुलगा अथवा मुलगी कोणत्या मित्रांसोबत जातात, मोबाइलमध्ये काय बघतात, याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. या नऊ नराधम तरुणांना कठोरातील कठोर शिक्षा सुनावण्याची मागणीही केली जात आहे.
ड्रगचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची मागणी एका निरागस अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा उचलत १८ तास तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार त्या तरुणांनी केला आहे. नराधमांनी मद्यपान करीत तिच्यावर अमानवी अत्याचार केले. ज्या भागात हा प्रकार घडला त्या भागात असे प्रकार नेहमीच घडत असल्याचे स्थानिक बोलत असून छुप्या पद्धतीने मद्यपान आणि ड्रगचे सेवन या भागात सर्रास केले जात होते, अशीही माहिती पुढे येत आहे. छोट्या-छोट्या गावातील स्थानिक तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग रॅकेटचा पोलिसांनी छडा लावून ते उद्ध्वस्त करण्याची मागणी केली जात आहे.