वाडा : गावातील विविध माहिती आणि सुविधा ग्रामस्थांना पुरवून गाव अधिक सक्षम व्हावे हे उद्दिष्ट ठेवून पिंपळास गावात ‘अभिमान’ केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पिंपळास या गावात केशवसृष्टी संस्थेच्या माध्यमातून तसेच मुंबईतील अंकुश अग्रवाल, राधिका अग्रवाल, गावातील तरुण विजय चौधरी, धनेश गवळी यांच्या संकल्पनेतून तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून येथे हे केंद्र उभारण्यात आले आहे.
या केंद्राच्या माध्यमातून येथे गावाचा इतिहास, नकाशा, इतर माहितीही सूचना फलकाद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच शेतकरी, विद्यार्थी, महिला, तरुण आणि शेती व इतर विविध संदर्भात माहितीपर पुस्तके, मासिके, वृत्तपत्र ठेवण्यात आली आहेत. ग्रामस्थांसाठी प्राथमिक उपचार म्हणून औषध पुरवठा तसेच प्रथमोपचार किट तर आपत्कालीन एखादी घटना घडल्यास ध्वनी इशारा (सायरन) चीही व्यवस्था करण्यात आली आहे.
पाणपोई सुविधेसोबतच गरजूंसाठी आवश्यक भेटवस्तू उपलब्ध करुन देण्यासाठी इतरांना सूचित केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.दरम्यान या अभिमान केंद्राचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घेऊन सशक्त व स्वावलंबनाकडे एक पाऊल उचलावे असे आवाहन केंद्राचे संकल्पक अंकुश अग्रवाल यांनी केले.