नालासोपारा : वसई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ताब्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोमात असून सध्या त्याची स्थिती खूपच बिकट आहे. या केंद्राची डागडुजी करून देखरेख करणे गरजेचे आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालय वसईमधील नागरिकांना व्यवस्थित व चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या ताब्यात देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना नगरसेविका शिल्पा सरोजकुमार सिंग यांनी केली आहे. युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन देऊन हे हस्तांतरित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
वसई-विरार महापालिकेतील लोकसंख्या अंदाजे २० ते २५ लाखांच्या वर असून वसई पश्चिमेकडील सर डी.एम. पेटिट रुग्णालय, नालासोपारा पूर्वेकडील विजयनगर-तुळींज रुग्णालय, महापालिकेची २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ९ दवाखाने यांच्यामार्फत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहे. जर ही प्राथमिक आरोग्य केंदे्र आणि शासकीय रुग्णालय हस्तांतरित करण्यात आले तर याचा फायदा नागरिकांना होऊन त्यांना वैद्यकीय सेवा वेळेवर आणि जलद उपलब्ध होईल. महापालिका हद्दीत सोपारा, नवघर, निर्मळ, आगाशी, चंदनसार आणि कामण ही ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे येतात. यातील एक किंवा दोन प्राथमिक आरोग्य केंद्र सोडली तर बाकीच्यांची परिस्थिती फार नाजूक आहे. काहींचे बांधकामही धोकादायक आहे. काही ठिकाणी औषधे उपलब्ध नसतात, तर काही वेळा डॉक्टरही वेळेवर उपलब्ध नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.सुविधा असूनही उपयोग नाहीनालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नाहीत. यामुळे शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य नागरिकांसह पोलिसांचेही हाल होत आहेत. यामुळे मृतांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो आहे.