अनिरुद्ध पाटील
बोर्डी : कोरोनाचा सामना करण्यासाठी सजग नागरिकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने मदतीचा ओघ सुरू असताना बोर्डीतील सूर्यहास चौधरी यांनी आपली दहा सीटर गाडी विनामूल्य उपलब्ध करून दिली. लॉकडाऊनच्या या काळात रुग्णसेवेसाठी तिचा वापर करता येणार आहे.महाराष्ट्र - गुजरात सीमेलगत डहाणू तालुक्यातील अस्वाली हे पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेले आणि जंगल, धरण यांनी व्यापलेले आदिवासीबहुल गाव. घोलवड प्रा.आ. केंद्रांतर्गत या गावात वैद्यकीय सेवा पुरवली जाते. मात्र, ग्रामस्थांना तेथपर्यंत पोहोचण्यासाठी २० किमी. अंतर कापावे लागते. येथे रिक्षा सेवेव्यतिरिक्त अन्य सार्वजनिक साधनांचा अभाव असून संध्याकाळनंतर ही सेवाही बंद होते. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यावरही निर्बंध आहेत.
अस्वाली, जळवाई, खुनवडे या आदिवासी पाड्यावरील गर्भवती, स्तनदा माता, वयोवृद्ध, मुले यांना आरोग्य केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी वाहनांची आवश्यकता आहे. ही गरज पूर्ण करून आरोग्य यंत्रणेवर या काळात येणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी चौधरी यांनी पुढाकार घेतला असून त्यांची गाडी अस्वाली ग्रा.पं.कडे विनामूल्य सोपवली आहे.हे खाजगी वाहन १० सीटर असून कायदेशीरदृष्ट्या सर्व कगदपत्रांची पूर्तता केलेली आहे. लॉकडाउन काळात स्थानिक रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अस्वाली ग्रामपंचायतीकडे गाडी विनामूल्य दिली आहे. - सूर्यहास चौधरी, स्थानिक शेतकरी