- पंकज राऊत लोकमत न्यूज नेटवर्क बोईसर : छोट्या-मोठ्या शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातही गावागावांत तीन व सहा आसनी रिक्षांची सेवा उपलब्ध असून आता रिक्षांकडेही ग्रामीण भागातील दळणवळणाचे साधन म्हणून पहिले जाते. परंतु कोरोनाने या रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडवले आहे. बिकट परिस्थितीमुळे त्यांचे कौटुंबिक जीवन अक्षरशः मेटाकुटीला आल्याने त्यांच्यासमोर जीवन-मरणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपयांची मदत जाहीर केल्याने जिल्ह्यातील ३२ हजार रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे.पश्चिम रेल्वेच्या नायगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिमेच्या रिक्षा स्टँडपासून वसई, नालासोपारा, विरार, वैतरणा, सफाळा, केळवे, पालघर, बोईसर, वाणगाव, डहाणू व घोलवड या जिल्ह्यांतील रेल्वे स्थानकांबरोबरच जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील मुख्य शहरांसह गावागावांत असे मिळून पालघर जिल्ह्यात सुमारे ३२ हजार तीन व सहा आसनी रिक्षाचालक - मालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा व्यवसायाद्वारे करतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा अनेक कार्यालये, उद्योग व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने शहरी व गावातील रिक्षा स्टँड सध्या ओस पडले आहेत.
१०-१२ तास रिक्षा चालवूनही भागत नाहीदरम्यान, सुमारे ३२ हजार रिक्षाचालकांना लवकरच मदत देण्यात येणार आहे, परंतु गगनाला भिडलेली प्रचंड महागाई, बरोबरच नवीन रिक्षांचे वाढलेले प्रचंड भाव, प्रत्येक वर्षी टॅक्स, विमा व पासिंगकरिता होणारा खर्च, स्पेअरपार्टसह देखभाल-दुरुस्तीसाठी वाढत जाणाऱ्या वारेमाप खर्चाचे ओझे, बँकेच्या कर्जाचा हप्ता, घरभाडे, मुला-बाळांच्या शिक्षणाचा, कुटुंबाचा आणि आरोग्यावर होणारा खर्च इत्यादी सर्व खर्चाची जुळवाजुळव करून दहा ते बारा तास रिक्षा चालवूनही आज तुटपुंजी रक्कम मिळत असल्याने काही रिक्षाचालकांसमोर कुटुंबाची आर्थिक गरज भागवायची कशी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
रिक्षाचालकांच्या प्रतिक्रियाअहोरात्र तत्परतेने सेवा देणारे रिक्षाचालक मागील वर्षापासून प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परवानाधारक रिक्षाचालकांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदतीबद्दल आभारी आहोत, परंतु ती मदत किमान पाच हजारांपर्यंत द्यावी व तीही लवकरात लवकर देण्यात यावी.- संजय ज. पाटील, सरचिटणीसपालघर जिल्हा ऑटो व टॅक्सी चालक-मालक संघटनाया कठीण काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने राज्यातील १२ लाख रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र देण्यात येणारे अर्थसाहाय्य कमी असून त्यामध्ये वाढ करावी. - संदीप पाटील, अध्यक्ष, जय महाराष्ट्र रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटना, बोईसर