वसई: शहर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या पाणी योजनेच्या मासवण येथील मुख्य पंम्पिंग स्टेशनमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ अडकत असल्याने पाणी सोडण्यात मोठी अडचण येत आहे. मात्र तरीही शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही, असे महापालिकेचे शहर अभियंता माधव जवादे यांनी लोकमत शी बोलताना स्पष्ट केले आहे.सूर्या धरणाच्या योजनेतून वसई-विरारला 100 एमएलडी पाणीपुरवठा होतो. शहराची ही मुख्य पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेचे मुख्य पंम्पिंग स्टेशन मासवण येथे असून या ठिकाणी नदीपात्रातून 3 पंपांव्दारे पाणी उचलले जाते व हे पाणी धुकटण येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते. या केंद्रातून पाणी शुद्ध होऊन शहरात वितरीत होते.दरम्यान दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पाणी वितरण करण्यास मोठी अडचण निर्माण होते,धरण भागात मागील तीन दिवसापासून जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे जुन्या व नवीन योजनेच्या पंप चा फ्लो खूपच कमी झाला आहे.परिणामी मासवण येथील मुख्य पंप व धुकटंन फिल्टर प्लांट मधील जुन्या योजनेचे 3 पैकी 2 आणि नव्या योजनेचे 4 पैकी 1 पंप आता सध्या सुरू आहे.मासवण येथील जॅकवेल मध्ये मोठया प्रमाणात गाळ जमा असल्याने तो युद्धपातळीवर बाहेर काढण्यात येत आहे.मात्र तरीही प्रवाहात सतत गाळ,प्लास्टिक, केर कचरा, झाडे व त्याच्या फांद्या वाहत येत असल्याने फिल्टर वारंवार चोकअप होत आहेत.तरीही पालिकेची तांत्रिक कर्मचारी व पथक हे काम अहोरात्र करीत आहेत. त्यामुळे सूर्या धरणातून होणारा पाणीपुरवठा अनियमति व कमी दाबाने होत आहे,तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सूर्या योजनेची जलवाहिनी दुरु स्ती किंवा इतर कारणांमुळे आधीच नागरिकांना अपुरा पाणी पुरवठा होत आहे. आता धो-धो पावसातही घरातील नळाला पुरेसे पाणी नसेल तर नागरिकांनी काय करायचे, असा ही प्रश्न नागरिक महापालिकेला विचारीत आहेत.अतिवृष्टी झाल्यानंतर पिम्पंग स्टेशनमध्ये गाळ, कचरा, प्लास्टिक अडकण्याची समस्या दरवर्षीची आहे. कचरा अडकल्याने पाणी उचलण्याची पंपांची क्षमता कमी होते. त्यामुळे आपोआप शहरात पाणी कमी येते. पालिकेचा पाणीपुरवठा विभाग पूर्णपणे अशा अडचणींना तोंड देण्यासाठी प्रयत्न करीत आहे,- माधव जवादे, शहर अभियंता, वसई विरार शहर महापालिका
पंम्पिंग स्टेशनमध्ये गाळ, पाणीपुरवठ्यात अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 3:56 AM