आशिष राणे
वसई महसुल विभागाने वसई पूर्वेस खानिवडे गावाजवळील खाडी किनाऱ्यावर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या रेती माफियांवर धडक कारवाई केली. सोमवार १० जानेवारी रोजी अचानकपणे केलेली कारवाई म्हणजे रेती माफियांना संक्राती अगोदरच दणका दिला आहे. वसई तहसीलदार उज्वला भगत व त्यांच्या तलाठी ,मंडळ अधिकारी व इतर महसूल कर्मचाऱ्यांनीं सोमवारी केलेल्या या अचानक धडक कारवाईत या खाडी लगत उभ्या असलेल्या ११ बोटी आणि १० संक्शन पंपाच्या इंजिनमध्ये साखर मिश्रित पाणी टाकून त्या अक्षरशः निकामी केल्याची माहिती तहसीलदार उज्वला भगत यांनी लोकमतला दिली. कोरोना काळात अवैध रेती उपसा करणाऱ्याच्या नाड्या आवळण्याची वलग्ना करणाऱ्या पोलीस प्रशासनाचं या घटनेनं चांगलच पितळ उघडं पडलं आहे.
खाडी किनारी आजही अवैध रेती उपसा सुरू असल्याच उघडं झालं असून वसईच्या तहसिलदार उज्वला भगत यांना सोमवार १० जानेवारी रोजी दुपारी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गा नजिकच्या खानिवडे गावाजवळील चिमणे येथील खाडी लगत अवैद्य रेती उपसा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. अखेर माहिती मिळताच त्या आपल्या महसुली टीम समवेत घटनास्थळी पोहचल्यावर तेथे त्यांना खाडी किनारी संक्शन पंपाच्या काही बोटी आढळून आल्या. त्यावेळी रेती माफियांनी तहसीलदार व त्यांच्या टीमला पाहून त्या बोटी तेथेच टाकून, अवैध रेती उपसा करणारे सर्वजण धूम ठोकून पळून गेले.
वसई तहसिलदारांनी खाडी लगत उभ्या असलेल्या सर्व ११ बोटी आणि १० संक्शन पंपाच्या इंजिनमध्ये साखर मिश्रित पाणी टाकून, त्या सर्व बोटी आणि संक्शन पंप नादुरुस्त केल्या आहेत. तहसीलदार यांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून वसई तालुक्यातील खाडी किनारी असा अवैध रेती उपसा सुरू असेल तर कारवाई करण्यात येईल आणि असे धाडसत्र सुरूच राहणार असल्याचेही तहसीलदार उज्वला भगत यांनी लोकमतला प्रतिक्रिया देताना सांगितले.