पालघर : संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी उद्या शनिवारी सायंकाळी ५ वाजता थंडावणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे तिच्यात विलक्षण चुरस निर्माण झाली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचारासाठी सभा घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. प्रारंभी पंचरंगी असलेली ही निवडणूक नंतर मात्र तिरंगी झाली.ही निवडणूक होते की नाही, असा प्रश्न होता. परंतु ती घोषित होताच शिवसेनेने दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना सेनेतर्फे उमेदवारी देऊन बाजी मारली. त्यामुळे पित्त खवळलेल्या भाजपाने काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना आपल्या दावणीला बांधून उमेदवारी दिली. तर काँग्रेसने दामू शिंगडा यांना आणि बविआने बळीराम जाधव यांना उमेदवारी दिली. डाव्यांनी किरण गहला यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली.काँग्रेसकडे साधनसामग्रीची कमतरता होती. तर बविआकडे पुरेसा जनाधार नव्हता. अशीच स्थिती डाव्यांच्या उमेदवाराची होती. त्यामुळे ही लढत कागदोपत्री पंचरंगी आणि वास्तवात मात्र सेना, भाजपा अशीच राहिली. प्रचारासाठी सेनेची धुरा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हा संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांनी तर भाजपाच्या प्रचाराची धुरा आ. प्रवीण दरेकर यांनी वाहिली. याच काळात भाजपाने जोरदार इनकमिंग घडविले. त्यात विक्रमगडच्या नीलेश सांबरे आणि त्यांच्या नगरसेवकांचा वाटा मोठा होता.सेना - भाजपासाठी प्रतिष्ठेची लढतसेनेकडे ग्राउंडवर्क चांगले होते. तर भाजपाकडे पैशाचे पाठबळ मोठे होते. प्रचाराची एकच राळ सेना-भाजपाने उडवून दिली होती. आदित्य ठाकरे यांनीही या प्रचारात रोड शोच्या रूपाने सहभाग घेतला. तर स्मृती इराणी यांच्या सभेला श्रोत्यांची कमतरता जाणवली. त्यामानाने काँग्रेसचा प्रचार खूपच नगण्य होता.मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघात अनेक सभा घेतल्या तर उद्धव ठाकरे यांनीही या मतदारसंघात सभा घेण्याचा विक्रम केला. बोलण्याच्या भरात मुख्यमंत्र्यांनी बविआचे सुप्रिमो हितेंद्र ठाकूर यांना ‘कुत्रा’ म्हटल्याने ते आणि बविआ प्रचंड नाराज झाले.
प्रचाराची रणधुमाळी आज संपणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 2:04 AM