पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रचारसभा होत आहेत, तर काही उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. त्यामुळे शनिवारी अनेक नेत्यांनी जिल्ह्यात भेटी देऊन जाहीर प्रचार सभा तसेच पत्रकार परिषदा घेतल्या. शिवसेनेतील नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनीही जिल्ह्याचा धावता दौरा केला. दरम्यान, कोणत्याच पक्षामध्ये थेट युती-आघाडी झालेली नसल्यामुळे तालुक्यात बहुरंगी लढती होत आहेत.पालघर जिल्हा परिषदेच्या गट व विक्रमगड पंचायत समितीच्या गणांच्या निवडणुकीसाठी येत्या ७ जानेवारीला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोणता पक्ष व उमेदवार प्रचारात आघाडी घेऊन बाजी मारणार यांच्याकडे मतदारांमध्ये देखील उत्सुकता लागली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाने आपले उमदेवार स्वतंत्र उभे केल्याने आपला उमदेवार कसा निवडून येईल व विजयी होईल यासाठी प्रयत्न करून आपला पक्ष कसा सरस ठरेल याची रणनीती प्रत्येक पक्ष आखताना दिसत आहे. सर्वच पक्षाचा प्रचार शिगेला पोहचला असून सर्वांचे पालघर जिल्ह्याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, विक्रमगड तालुक्यातील आलोंडा गटात बिग फाईट पाहायला मिळणार आहे.>भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार२०१५ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत आलोंडा गटात भाजप विजयी झाली होती तर आलोंडा व चिंचघर गणात भाजप विजयी झाली होती. मात्र या यंदाच्या निवडणुकीत ऐनवेळी भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने मुख्य लढत पालघर विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे व शिवसेनेचे मिठाराम भोईर यांच्यामध्ये होणार आहे. असे असले तरी या गटात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात असून भाजपचा उमेदवार नसल्याने भाजप कोणाला मदत करते यावर सर्व अवलंबून आहे.>आलोंडा गटात आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही आहे. पाठिंबा देण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नसून वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा सुरू आहे.-संदीप पावडे, तालुका अध्यक्ष, भाजप>आलोंडा गटात आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून गणात आमच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.-तुषार सांबरे, तालुका अध्यक्ष, श्रमजीवी संघटना
प्रचाराच्या तोफा थंडावणार, आज संध्याकाळी पाचपर्यंत रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 1:36 AM