वसई : प्रतिनियुक्तीची कोणतेही शिफारस नसतांना चंदनसार प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आणि पारोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडीच्या पैशांचा अपहार करणाऱ्या शिपायाची वेतनवाढ रोखण्यात आली असून पंचायत समितीने त्याची बदली करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे.सध्या पारोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेला शिपाई सुभाष रामचंद्र नाईक याने ३० जून त ४ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत ओपीडीची बँकेत भरणा करण्यासाठी दिलेली रक्कम हडप केली होती. वारंवार समज देऊनही तो पैसे भरत नसल्याने वैद्यकीय अधिकारी अरुणा मेश्राम यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याची चौकशी सुरु करण्यात आली होती. चौकशी सुरु असताना त्याने कामावर येणे बंद केले होते. कारवाईचे संकेत मिळाल्यानंतर त्याने ही रक्कम बँकेत भरली. याप्रकरणी त्याची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याची पारोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातून बदली करण्यात यावी, असा प्रस्ताव पंचायत समितीने पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे पाठवला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब जाधव यांनी दिली. दरम्यान, याआधी त्याने प्रतिनियुक्तीचे खोटे आदेश तयार करून चंदनसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वत:ची बदली करून घेतल्याचा प्रकार उजडात आला आहे.(प्रतिनिधी)
‘त्या’ शिपायाच्या बदलीचा प्रस्ताव
By admin | Published: January 13, 2017 5:52 AM