लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील मीरा-भाईंदर महापालिकेच्या आरक्षणाच्या मालकी जागेत झालेल्या बेकायदा गोदाम व झोपड्यांना महापालिकेनेच संरक्षण दिल्याने बुधवारी भीषण आग लागून एकाचा बळी गेला. याप्रकरणी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे आगीची घटना घडूनही पालिका मात्र जागा अतिक्रमणमुक्त करण्यास पालिका अजूनही चालढकल करीत आहे.
भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील पालिका आरक्षणाची जागा ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोक्याची आहे. आरक्षणाची जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने विकासक व जमीनमालकांना कोट्यवधी रुपयांचा मोबदला ‘टीडीआर’द्वारे दिलेला आहे, तर एका प्रकरणात अतिक्रमण असूनसुद्धा एका राजकीय व्यक्तीशी संबंधिताला पालिकेने ‘टीडीआर’ देण्याचा प्रताप केला असल्याचे आरोप होत आले आहेत. येथील एक पक्के मोठे अनधिकृत धार्मिक स्थळ तोडू नये, म्हणून संबंधित मुंबई उच्च न्यायालयात गेले असता, तेथे त्यांना दिलासा मिळाला नाही; परंतु पालिकेने अजूनही ते बेकायदा बांधकाम तोडलेले नाही.
‘न्यू गोल्डन नेस्ट’कडे जाणाऱ्या रस्त्यालगत या पालिका भूखंडात मोठ्या प्रमाणात गोदामे, झोपड्या; तसेच पक्की बांधकामे होऊनही महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांपासून अतिक्रमणाचे वरिष्ठ अधिकारी यांनी ही जागा मोकळी करून घेतली नाही. याप्रकरणी तत्कालीन स्थानिक शिवसेना नगरसेविका तारा घरत, स्नेहा पांडे आदींनी पालिकेकडे आरक्षणाची जागा मोकळी करण्यासाठी तक्रारी केल्या होत्या. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या मोकळ्या भागात घरत, पांडे या स्थानिक नगरसेविकांनी वृक्षारोपण केले होते; परंतु काही काळाने झाडे काढून टाकून माफियांनी पुन्हा अतिक्रमणे केली.