भातसानगर : राज्यात २ हजार ३८८ अनुदानित वसतिगृहे विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवली जातात. या धर्तीवर राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत विविध आदिवासी खात्याच्या आश्रमशाळेशी जोडलेली वसतिगृहही कार्यरत आहेत. मात्र येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. या वा अन्य मागण्यांसाठी वसतिगृह कर्मचारी संघटनेचा मोर्चा प्रजासत्ताकदिनी मुंबईत धडकणार आहेत.
वास्तविक पाहता वसतिगृह ही सरकारची १९६० पासूनची योजना आहे. तर आश्रमशाळा ही योजना १९७६ नंतर कार्यरत झाली. अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना सध्या अधीक्षकांना ९ हजार २०० रुपये, स्वयंपाकींना ६ हजार ९०० रुपये, मदतनीस व चौकीदार यांना ५ हजार ७५० दरमहा मानधन दिले जाते. दोन्ही ठिकाणच्या वसतिगृहातील कर्मचारी २४ तास कार्यरत असतो. परंतु अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांबाबत वैद्यकीय सेवा अशा कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे याचा विचार करून सरकारने या आंदोलनाची दखल घेत त्यासाठी योग्य तो निर्णय घेऊन या कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ सरकारी नियमाप्रमाणे पगार द्यावा, अशी विनंती महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी हा मोर्चा हुतात्मा चौक येथे निघाला आहे.
या मोर्चाद्वारे प्रजासत्ताक दिनास निषेध नोंदवून राज्यातील हजारो कर्मचारी स्वतःहून पोलीस आयुक्तांना स्वाधीन होणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकात देण्यात आली आहे. या मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष मारुती कांबळे, अशोक ठाकर, दातात्रे पाटील, पंकज पाटील, मीना पिचड हे करीत आहेत.