वसई : दिवाळीच्या तिसऱ्या दिवसांपासून पालघर जिल्हयातील डहाणू , तलासरी तालुक्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या हाद-याने रहिवासी भयभीत झाले आहेत. त्यांच्यासाठी योग्य ती उपाययोजना करून त्यांना सरकारने दिलासा द्यावा असे साकडे आमदार हितेंद्र व क्षितीज ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे. त्यांनी तसे निवेदन मुख्यामंत्र्यांना दिले.मागील तीन महिन्यांपासून डहाणू तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या हद्दीत लहान मोठे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. नागरिकांना घर सोडून बाहेर जावे लागत आहे. भिंतींना तडे, जाऊन घराची पडझड होत आहे. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थित २० टक्क्यांपर्यंत घसरली आहे. इतर शाळेत ५० टक्के इतकी झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी भूकंपाचे ५ धक्के बसले. त्यातील एक ४.१ रिश्टर स्केलचा होता. नागरिक यामुळे भयभीत झाले आहेत. हळदपाडा गावातील दोन वर्षाची चिमुरडी जिवाच्या आकांताने बाहेर आली मात्र दुर्दैवाने दगडावर डोके आपटून तिचा जागीच मृत्यू झाला. गेल्या चार महिन्यांपासून पालघर जिल्हावासीय भीतीच्या सावटाखाली आहेत डहाणू, तलासरी भागात होत असलेल्या भूकंपाला केवळ स्थानिक समस्या समजून दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही. भूकंपग्रस्त भागापासून १८ किमी वर कुर्झे धरण, सूर्या प्रकल्पातील कवडास, धामणी धरणे आहेत. त्याशिवाय जव्हार येथे दमणगंगा, व वैतरणा खोरे देखील आहे. पालघर जिल्ह्यात ७७ प्रकल्पाची कामे सुरु आहेत तेवढीच कामे प्रस्तावित आहेत. गौण खानिजसाठी वारंवार सुरुंग लावून स्फोट केले जातात, रिलायन्स औष्णिक विद्युत केंद्र, तारापूर अणुशक्ती केंद्र, एमआयडीसी असे महत्वाचे प्रकल्प आहेत. भूकंपाची तीव्रता वाढली तर मोठया व देशासाठी महत्वाच्या असणाºया प्रकल्पाना धोका निर्माण होऊ शकतो. भूकंप नेमके का होतात, यातून सुटका कशी व कधी होणार या विचारात पालघरवासीय आहेत. डहाणू, तलासरी मध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले असले तरी घरादारात राहणाºया नागरिकांच्या मनात दहशत आहे.>मानसिक आधार द्या!भूकंप कधी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे अनेकांनी घराबाहेर संसार मांडला आहे त्याचे छत गेले आहे. अनेक गाव पाड्यातील नागरिक स्थलांतरित होत आहेत. या नागरिकांना मानसिक आधाराची देखील नितांत गरज आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.
उपायोजना करून भूकंपग्रस्तांना दिलासा द्या -आमदारांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:10 AM