बोर्डी: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नका, असे आवाहन डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांनी गणेश मंडळांना केले आहे. घोलवड ग्रामपंचायतीच्या सभागृहात पोलिसांनी सभेचे आयोजन केले होते. त्याला गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते, त्यांनी आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सामाजिक ऐक्य आणि देशभक्ती जागृत ठेवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली होती. मात्र, ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना, देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता, प्रशासनाला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नये, असे आवाहन नागरिकांना करावे लागत आहे. विषाणूची साखळी तुटून संसर्ग रोखला जावा, याकरिता गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करू नये, तर खाजगी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांनी केले. घोलवड पोलिसांच्या वतीने या उत्सवाच्या अनुषंगाने सभेचे आयोजन केले होते, त्या वेळी ते बोलत होते. सीमेलगतच्या घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गत १९ गावांचा समावेश असून गेल्या वर्षी या भागात ७२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व २१५ खाजगी गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. त्याअनुषंगाने सार्वजनिक व खाजगी गणेशोत्सव मंडळांंच्या पदाधिकाऱ्यांकरिता उत्सवाच्या अनुषंगाने सभेचे आयोजन सोशल डिस्टन्सिंग नियमांच्या अधीन राहून करण्यात आले होते.दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव आयोजनाकरिता होणाºया खर्चाची रक्कम ही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री सहाय्यता फंडामध्ये जमा करावी, असे धर्माधिकारी म्हणाले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, आदिवासी युवक गणेश मंडळ चिखले, ओमकार मित्र गणेश मंडळ चिखले, सार्वजनिक गणेश मंडळ घोलवड, गणेशवाडी यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश जमा करण्याचा निर्णय जाहीर केला. उत्सवकाळात या मोहिमेला अनेक मंडळांनी आर्थिक हातभार लावल्यास हा स्तुत्य उपक्रम ठरेल. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ घोलवड रेल्वे स्टेशन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिंबावे नारळीपाडा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिंबावे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कोसबाड यांनी यंदा आयोजन न करण्याचे ठरविले आहे.>मंडळांचा पाठिंबापालघर जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाण्यांच्या अंगर्तत पोलीस अधिकारी ठिकठिकाणी लोकांच्या गाठीभेटी घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना तसेच गणेशोत्सव मंडळांना आवाहन करीत आहेत. पोलिसांच्या या आवाहनाला गणेशोत्सव मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक मंडळांनी आपापल्या परीने कोविडविरोधी लढाईसाठी देणग्या जमा करण्यास सुरुवात केली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवांचा निधी कोविडविरोधातील लढाईसाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 2:10 AM