बोर्डी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विद्यमाने घोलवड नजीकच्या मरवाडा या ग्रामीण भागात अर्जुन कल्याण माच्छी या सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन रविवार, ५ मे रोजी या परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळूसकर यांच्या हस्ते पार पडले. तर पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण ना. दवणे कार्यक्र माचे अध्यक्ष होते. यावेळी ग्रंथतुलेतून उपस्थितांनी वाचनालयाला सढळहस्ते मदत केली. त्यानंतर निवडक कवींनी काव्यवाचन केले, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.खेडोपाड्यात वाचन संस्कृती रुळावी या उद्देशाने हे वाचनालय उघडण्यात आले. त्याला अनेक दात्यांनी पुस्तकरुपी भेट दिली. त्यांचे आभार या वाचनालयाच्या संचालिका कवियत्री विणा अजित माच्छी यांनी मानले. तर या वाचनालयाची निर्मिती, संकल्पना व स्थापनेपर्यंतचा प्रवास अजित माच्छी यांनी उलगडला. शिवाय ग्रामीण भागात नवकवींना प्रोत्साहन देण्याकरिता पद्मश्री मधु मंगेश कवीकट्ट्याची स्थापना करण्यात आली. यावेळी साहित्यलेखनाला प्रारंभ करण्याचा वसा उपस्थितांपैकी अनेकांनी घेतला.ओंजळीतील फुले, सुगंध तर पुस्तके भविष्य घडवत असल्याचं मार्गदर्शन कोमसापचे केंद्रीय कार्यवाह शशिकांत तिरोडकर यांनी केले. घरात सार्वजनिक वाचनालयाला जागा उपलब्ध करून चिकूच्या गावी, पुस्तकांची बाग फुलवण्याचा माच्छी दाम्पत्यांचा निर्णय परिवर्तन घडविणारा असून हे भविष्यातील उर्जाकेंद्र बनेल असा विश्वास डॉ. महेश केळुसकर यांनी व्यक्त केला. या साहित्याच्या बँकेत पुस्तकांची केलेली गुंतवणूक समाज उद्धाराचे कार्य असल्याचा गौरव अध्यक्षीय भाषणातून प्रवीण ना. दवणे यांनी अध्यक्षीय भाषणातून केला. प्रा. डॉ. अंजली मस्कराहन्स यांच्या आदिवासी लोककथा मीमांसा या पुस्तकांचे प्रकाशन पार पडले. त्यानंतर पालघर, ठाणे, कोकण, पुणे, औरंगाबाद तसेच उर्वरित महाराष्ट्रातून आलेल्या निमंत्रित कवींनी कविता सादर केल्या, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जेष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, उद्योजक रौनक शहा, कोमसाप डहाणू शाखा अध्यक्ष सदानंद संखे, संपादक रामदास वाघमारे, घोलवड सरपंच राजश्री कौल, धीरज बारी आदी उपस्थित होते.ग्रामीण वाचन चळवळीकरिता ग्रंथतुलाडहाणूच्या ग्रामीण भागात वाचनालयाचा अभाव आहे. मोबाईल आणि व्हॉट्सअपच्या युगात पुस्तकांकडे वळणारेही विरळाच. त्यामुळे धकाधकीच्या जीवनातही युवकांना वाचन संस्कृतीकडे वळविण्याच्या दृष्टिकोनातून पत्रकार विकास राऊत यांच्या संकल्पनेतून ही ग्रंथतुला करण्यात आली. यावेळी अनेक दात्यांनी वाचनालयाला भेट दिलेल्या पुस्तकांनी कवियत्री विणा माच्छी यांची ग्रंथतुला करण्यात आली. या चळवळीला प्रेरणा देण्यासाठी प्रत्येकाने पुस्तके दान करावीत असे आवाहन आयोजकांनी उपस्थितांना केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या भरभराटीकरिता ग्रंथतुला, ग्रामीण भागात वाचनसंस्कृतीच्या वाढीकरिता नागरिक सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 12:18 AM