- अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी, कुणबी, मांगेला आणि पांचाळ या समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन शनिवार, 22 सप्टेंबर रोजी पारनाका येथील लोहाना सभागृहात पार पडला. यांचे लेखन भगवान राजपूत यांनी केले आहे.
सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन माजी खासदार ल. शी. कोम कार्यक्रमाचे अध्यक्ष, तर प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. बी. बी. गुंजाळ, कॉम्रेड धनगर, माजी जि. प. सदस्य विवेक कोरे, साहित्यियाचार्य पंढरीनाथ तमोरे, लेखिका व समीक्षक डॉ. अलका मटकर आदी. उपस्थितांच्या हस्ते पार पडले. या मान्ययवरांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वाडवळ, भंडारी, कुणबी, मांगेला आणि पांचाळ या सहा समाजातील लोकजीवन व लोकसंस्कृती या डॉ. भगवान राजपूत यांच्या अभ्यासग्रंथांचे प्रकाशन पार पडले.
राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असून पालघर जिल्ह्यातील वसई ज्युनिअर कॉलेज, पी. एल. श्रॉफ चिंचणी आणि तलासरी कॉम्रेड गोदावरी परुळेकर या महाविद्यालयात अध्यापन केले आहे. दरम्यान उत्तर कोकणातील कर्मभूमीत स्थानिक लोकसंस्कृतीचा अभ्यास व साहित्याचा अभ्यास करून पुणे विद्यापीठासाठी शोधप्रबंध सादर केला होता. त्याचे रूपांतर अभ्यासग्रंथा मध्ये झाले. एकादी विशिष्ट बोली घेऊन त्यावर काम करणे खूप कठीण असून सहा समाजातील सूक्ष्म अभ्यास त्यांनी पुस्तकातून मांडला आहे. प्रत्यक्ष भेटीतून त्यांनी पायपीट करून सर्व माहिती मिळवली आहे. या संशोधनात्मक लेखनात कोरडेपणा नाही, असे गौरवोद्गार डॉ. अलका मटकर यांनी काढले. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी लोकसाहित्याचं संकल केले. ही खूप कठीण बाब असून राजपुत यांनी हे काम उत्कृष्टपणे केले आहे. पुस्तकातील लोकगीतं अप्रतिम असल्याचा उल्लेख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. तुकाराम रोंगटे यांनी यावेळी केला.
लोकसाहित्याच्या संशोधनाच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेल्या पालघर जिल्ह्यातील जाती जमातीच्या बोली व जीवन या विषयी महाराष्ट्रातील साहित्यात मोलाची भर टाकल्याचे, त्यांचे शिष्य प्रा. मेस्त्री यांनी मनोगतातून व्यक्त केले. आजतागायत कोणत्याच विद्यापीठाने वाक्प्रचार व म्हणींचा कोर्स सुरू केलेला नाही, मात्र राजपूत यांच्या पुस्तकात हे कोष पहावयास मिळतात हे विशेष असल्याचे पीएचडी मार्गदर्शक डॉ. बी. बी. गुंजाळ यांनी केला.