लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने वसई-विरार शहर महानगरपालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक पुन्हा काही कालावधीकरिता लांबणीवर पडली आहे. यामुळे निवडणूक लढवू पाहणाऱ्या प्रस्थापितांसह इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक इच्छुक उमेदवारांनी आचारसंहिता लागण्याआधीच बराच खर्च केला होता. मात्र, निवडणुका लांबणीवर पडल्याने केलेला खर्च वाया जाण्याबरोबरच मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुन्हा निधी कोठून आणायचा, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
वसई-विरार महापालिकेची तिसरी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल किंवा मे २०२० मध्ये होणार होती. आधीच कोरोना महामारीमुळे निवडणुका तब्बल वर्षभर लांबणीवर पडल्या आहेत. या काळात कोरोना महामारीचा उद्रेक झालेला असतानाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रस्थापितांनी तसेच निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छुकांनी जीवाचे रान करून स्थानिक रहिवाशांच्या पर्यायाने मतदारांच्या गळ्यातील ताईत बनण्याचा प्रयत्नही केला होता. मास्क वाटप, सॅनिटायझर्सचे वाटप, आर्सेनिक या रोगप्रतिकारक गोळ्यांचे वितरण, धान्याचे वाटप, कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात प्रवेश मिळवून देणे, आयसीयूमध्ये प्रवेश मिळवून देणे, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे, अगदी कोरोनाने मृत्यू झाल्यास रुग्णवाहिका ते स्मशानभूमीपर्यंतची तजवीज करणे, कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या घरी जाऊन सांत्वन करणे, कोरोना रुग्णांच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात सतत जंतुनाशक फवारणी, स्वस्त दरात भाज्यांची, फळाची, धान्याची विक्री यासह शेकडो उपक्रम प्रभागा-प्रभागातील कानाकोपऱ्यात, चौकाचौकात सातत्याने राबविण्यात आले. हे समाजकार्य करताना अनेकांना कोरोनाचीही लागण झाली होती.
...आणि पुन्हा ‘कोरोनाचे मांजर’ आले आडवे !कोरोनातून बरे होताच निवडणूक लढवू पाहणारे काही जण पुन्हा जनसेवेत व्यस्त झाल्याचे पाहावयास मिळाले. त्याच वेळी निवडणुकीच्या मतदार याद्यांचा कार्यक्रमही जाहीर झाला. प्रस्थापितांसह इच्छुकांनी हरकती घेण्याचा जोरदार कार्यक्रम पार पाडला. मातब्बरांनी दुसऱ्यांच्या प्रभागात अतिक्रमण करून निवडणूक लढविण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या असतानाच पुन्हा एकवार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढवू पाहणाऱ्या प्रस्थापितांसह इच्छुकांच्या वाटचालीत पुन्हा कोरोना महामारीचे मांजर आडवे आले आहे.