पालघर : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फायदा उचलीत पालघर नगर परिषदेने पालघर-मनोर रस्त्यावरील मच्छी बाजार हटवीत शेकडो मच्छीमार महिलांच्या उदरनिर्वाहावर घाला घातला आहे. अनधिकृत असल्याचा ठपका ठेवताना शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर रिक्षा स्टँड, हातगाडीवरील विक्रेते यांच्याकडे मात्र न.प.कडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप मच्छीमार महिलांनी केला आहे.
पालघरच्या पश्चिमेस जुना पालघर भागात मागील अनेक वर्षांपासून एकमेव मासळी मार्केट आहे. वाढत्या शहरीकरणाचा वेध घेत शहरात अद्ययावत मासळी मार्केट, भाजीपाला मार्केटची उभारणी होणे अपेक्षित होते. परंतु अनेक पक्षांची सत्ता उपभोगून झाली, मात्र नागरिकांना हव्या त्या सोयी-सुविधांची उभारणी करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले. शहरातील जुन्या मच्छी मार्केटचा प्रश्न विकास योजनेत (डीपी) रस्ता एका बाजूला घेतल्याने भिजत घोंगडे स्वरूपात असल्यामुळे मार्केटच्या नूतनीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. पालघर शहर एका बाजूला वाढत असताना दुसरीकडे पालघर जिल्ह्याचे केंद्र बनल्याने नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. त्यांच्या गरजा वाढू लागल्यानंतर अनेक वर्षापासून पालघर-मनोर रस्त्याच्या कडेला मच्छी विक्रेत्या महिला मासेविक्रीसाठी बसू लागल्या. आज त्यांची संख्या शेकडोच्या घरात पोचली असून त्या महिलांचा जाच काही शहरवासीयांना होऊ लागल्याने तक्रारी करण्यात आल्या. तक्रारदार काही नगरसेवकांचे व्होट बँक असल्याने या मच्छी मार्केटला अनधिकृत ठरवीत वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या मुद्द्यावर नगरपरिषदेच्या सभेत बाजार हटविण्याबाबत ठराव घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेताना नगर परिषदेला हातगाडीवर भाजीपाला विक्री करणारे, बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेले रिक्षा स्टँड, मोटारसायकल स्टँड याकडे दुर्लक्ष करीत ते हटविण्याचे धाडस मात्र झालेले नाही. पालघर-मनोर रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचा आरोप करीत हा बाजार पूर्वेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत हलविण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात मासेविक्री बंद ठेवण्यात आल्याचा फायदा उचलीत नगरपरिषदेने मासे विक्री करण्याच्या जागेवर बांबूचे कुंपण घालून मासे विक्री करण्यास मनाई करण्यात आली.मंगळवारी ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, ठाणे जिल्हा समाज संघाचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल, संचालिका ज्योती मेहेर, मानेंद्र आरेकर, परशुराम मेहेर, सेनेचे तालुकाध्यक्ष विकास मोरे, दर्शना पागधरे, जगदीश नाईक आदींनी उपनगराध्यक्ष उत्तम घरत, मुख्याधिकारी स्वाती देशपांडे-कुलकर्णी, गटनेते कैलास म्हात्रे, सभापती चंद्रशेखर वडे आदींची भेट घेत निवेदन दिले. जोपर्यंत पश्चिमेकडील सर्व विक्रेत्यांना पूर्वेला आणले जात नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही, असा पवित्रा मच्छीमार प्रतिनिधींनी घेतला.