ऑनलाइन लोकमत
वाडा, दि. 16 - चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात दहावी परीक्षेचे केंद्र असून आज भूमितीचा पेपर होता. मात्र परीक्षा मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल दोन तास उशिराने प्रश्नपत्रिका आल्याने विद्यार्थांना ताटकळत बसावे लागले. या भोंगळ कारभार प्रकरणाने पालक चांगलेच संतापले आहेत. झालेल्या निष्काळजीपणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सुरू आहे.
तालुक्यातील सर्व केंद्रांच्या प्रश्नपत्रिका वाडा कस्टडीमध्ये जावून घेतल्या जातात. चिंचघर येथे ह.वि.पाटील विद्यालयात सहा शाळांचे 823 विद्यार्थी भूमिती विषयाची परीक्षा देत आहेत. यातील 129 विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे तर 211 विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमाचे आहेत. गुरुवारी सकाळी चिंचघर येथील परीक्षा केंद्रावर वाडा येथील कस्टडीमधून सिलबंद प्रश्नपत्रिका आल्यावर नियोजित वेळेत ठरल्याप्रमाणे लिलाफे उघडण्यात आले असता इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आल्या नसल्याचे केंद्र प्रमुखांच्या लक्षात आले.
त्यानंतर चिंचघर येथील शिक्षण संस्थेचे सदस्य श्रीकांत भोईर व नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुस्तफा मेमन यांनी तातडीने लक्ष घालून केंद्र प्रमुखांकडे चौकशी केली असता ही चूक बोर्डाकडून झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पुढील बेजबाबदारपणा म्हणजे केंद्र प्रमुखांसहवरील सर्वांनी धावाधाव केली असता बोर्डाकडून ऑनलाईन एक प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यानंतर तिच्या एका खासगी दुकानातून पेपरची झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या.