वाडा : बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम पंचायत समिती कृषी विभागाकडून हाती घेण्यात आला होता. मंगळवारी संध्याकाळी होणाºया या वाटपासाठी शेतकºयांनी पहाटेपासूनच रांगा लावल्याचे दिसून येत होते. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी, कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि अपुºया कर्मचाºयांमुळे शेतकºयांना भर उन्हात तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. तर बियाणे न मिळाल्याने असंख्य शेतकरी रिकाम्या हाताने परतले.
तालुक्यातील शेतकºयांसाठी पंचायत समितीकडून भात बियाणे वाटप करणार असल्याचे पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून कळवण्यात आले होते. या भात बियाण्यांचे टोकन वाड्यातील जिल्हा परिषद शाळा-१ मध्ये दिले जात होते. तर भात बियाणांचे प्रत्यक्ष वाटप पंचायत समितीसमोरील शासकीय गोदामात करण्यात येत होते. हे भात बियाणे घेण्यासाठी शेतकºयांनी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
एकीकडे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकºयांना बांधावर बियाणे तसेच खते, औषधे पुरवावीत अशा सूचना प्रशासनाला केल्या. तरीही शेतकºयांना उन्हातान्हात रांगा लावून ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र या वेळी दिसले.
पंचायत समितीकडून तालुक्यातील शेतकºयांसाठी ४२० क्विंटल भात बियाण्यांची मागणी केली होती. मात्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात अवघे १९० क्विंटलच भातबियाणे प्राप्त झाल्याने तालुक्यातील केवळ ७०० शेतकºयांनाच हे भात बियाणे मिळाले. त्यामुळे उपस्थित उर्वरित हजारो शेतकºयांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.