जगदीश भोवड/हितेन नाईक - पालघर : लसीकरणासाठी एकीकडे ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा दिसत असताना, १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनाही लसीकरणासाठी परवानगी मिळाल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होताना दिसत होती. ही केंद्रेच कोरोनाची ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची भीती व्यक्त होत होती. अखेर सरकारने आता ज्येष्ठ आणि दिव्यांगांना ‘लसदिलासा’ दिला आहे. यामुळे यापुढे तरी ज्येष्ठ नागरिकांना रांगा लावाव्या लागणार नाहीत, अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण फक्त ०.०१ टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.राज्यात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरणाला परवानगी मिळाली होती. एकीकडे लसींचा साठा अपुरा आणि लसीकरणासाठी होणारी ज्येष्ठांसह तरुणांची गर्दी चिंतेचा विषय ठरत होती. लसींचा साठा शिल्लक नसल्याने जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचीही वेळ प्रशासनावर आली होती. यामुळे खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रे बंदच ठेवली गेली होती. दुसरीकडे वसई-विरारसह अनेक शहरी भागांतील नागरिकांना पालघरच्या ग्रामीण भागांतील लसीकरण केंद्रांवरचा स्लॉट मिळताना दिसत होता. मात्र त्यामुळे त्या त्या लसीकरण केंद्रांवर संघर्ष होतानाही दिसत होते. दरम्यान, सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता ज्येष्ठांचे लसीकरण आधी होणार असून, १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्पपालघर जिल्ह्यात डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प असून, आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार ०.०१ टक्के डोस वाया गेले आहेत. आरोग्य खात्याने योग्य नियोजन करून डोस दिल्यामुळेच जिल्ह्यात डोस जास्त वाया गेले नाहीत, ही समाधानाची बाब आहे.
सकाळी सातपासूनच रांगा- पालघर जिल्ह्याच्या एकूण आठ तालुक्यांतील शहरी, ग्रामीण तसेच डोंगराळ भागांतील नागरिकांमध्ये लसीकरणासाठी सुरुवातीला फारसा उत्साह दिसून येत नव्हता. - मात्र कोरोनाची दुसरी लाट अनेकांना बाधित करीत असल्याचे आणि त्यात अनेक कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांमध्ये भीती पसरली. - यानंतर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होऊ लागली. यामुळे सकाळी सहा-सात वाजल्यापासूनच लोक रांगा लावत असल्याचे दिसून येऊ लागले.
जिल्ह्यात आजवर झालेले लसीकरण ३,१२,२७०१८ ते ४४ साठी किती? १५,३३३४५ पेक्षा जास्त वयोगटासाठी किती? १८४६७९
काही पहिल्या तर काही दुसऱ्या डोससाठी रांगेत१ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणास परवानगी मिळाल्यानंतर तर लसीकरण केंद्रांवर मोठी रांग लागताना दिसून येऊ लागली. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठी गर्दी उसळत असे. यामध्ये १८ ते ४४ वर्षांदरम्यानचे लोक पहिल्या डोससाठी, तर ४५ वर्षांवरील लोक दुसऱ्या डोससाठी रांगेत असलेले पाहायला मिळाले. तर अनेकवेळा लसींचा साठा संपल्याने लोकांना निराश होऊन परतावे लागत असल्याचेही दिसून आले.
जिल्ह्यात लसी वाया जाण्याचे प्रमाण ०.०१ टक्के इतके अत्यल्प आहे. नियोजनात्मक लसीकरण मोहीम अवलंब केला जात असताना, १० लाभार्थी आल्याशिवाय लस वायल उघडली जात नाही. परिणामी लस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.- डॉ. मिलिंद चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., पालघर