- राहुल वाडेकर विक्रमगड : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा लांंबलेला पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आधीच मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला. मात्र आता त्याचे पडसाद रब्बी हंगामावरही पडताना दिसत आहेत. गेल्या सहा-सात दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी-अधिक होत असतानाच, वारंंवार होत असलेले ढगाळ वातावरण आणि मध्ये मध्ये रिमझिम पावसाचा शिडकावा यामुळे वातावरणात होत असलेले बदल यामुळे आता रब्बी हंगामही अडचणीत सापडला आहे.वातावरण स्वच्छ नसल्याने याचा परिणाम पिकांवर होऊन लागवड केलेले उडिदाचे पीक, तुरीचे पीक हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे, तर तीळ व वालाची वाढ खुंटणार आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विक्रमगड तालुक्यात व परिसरात रब्बी पिकांचे मोठे क्षेत्र होऊ लागले आहे. या हंगामात शेतकरी मुग, हरभरा, वाल, उडीद, तुर या कडधान्यांबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, गवार, टॉमेटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक आदी भाजीपाला पिके घेतात. रंब्बी हंगामात बहुतेकदा खरीप हंगामातील आर्थिक तूट भरून काढली जाते. या वर्षी पावसाची उत्तम सुरुवात झाली, मात्र प्रमाणापेक्षा जास्त पाउस झाल्याने काही भागात भात पीक वाहून गेले, तर काही भागांत भात कुजण्याचे प्रकार घडले. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी भात शेतीची लवकर कापणी उरकून भाजीपाल्याची लागवड केली. जमिनीला पुरेसा ओलावा असल्याने शेतकºयांनी भाजीपाल्याची लागवड केली. मूग, हरभरा, तुर फुलोरा येऊन शेंगा व हरभºयाला घाट्या लागल्या आहेत. मात्र गेले काही दिवस जास्त थंडी तर काही दिवस ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील फळ पिकांची वाढ खुंटल्याने याचा परिणाम तीळ, उडीद व वालाच्या रोपांच्या वाढीवर होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच लाखो रुपये खर्च करून शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात झेंडू लागवड केली आहे. असे असताना ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाचा परिणाम झेंडूच्या रोपांच्या वाढीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वारंवार वातावणामध्ये बदल होत असून कधी कमी-अधिक थंडी तर कधी ढगाळ वातावरण याचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. थंडीचे कमी-अधिक प्रमाण होत असल्याने कडधान्यांच्या रोपांची वाढ खुंटली आहे.-पंढरीनाथ सांबरे, शेतकरीवारंवार बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील तीळ, उडीद, तुर, हरभरा पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.- ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विक्रमगड
ढगाळ वातावरणामुळे यंदा रब्बी हंगाम अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:03 PM