नालासोपारा : बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेचे सुमारे १५०० कार्यकर्ते रविवारी रात्री नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येर्थेे रस्त्यावर आल्याने रात्रभर राडा सुरू होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला. पण शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या गाडीतून ६४ हजारांची रक्कम सापडल्याने त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला. तर महापौरांसह ६ नगरसेवक आणि शिवसेनेच्या आमदार, उपजिल्हाप्रमुखासह ६ पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या कलमान्वये तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेआमदार रवींद्र फाटक हे मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास महायुतीच्या प्रचार कार्यालयात बसले होते. तर त्यांचा स्वीय सहायक वअंगरक्षक रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीत बसले होते. बविआचे महापौर रूपेश जाधव हे कार्यकर्त्यांसह तेथून जात होते. एवढ्या रात्री कार्यालय चालू कसे, असा संशय आल्याने ते तेथे थांबले.
निवडणुकीच्या आधी मतदारांना खूश करण्यासाठी शिवसेना पैसे वाटत असल्याचा जाधव यांनी आवाज उठवताच ती बातमी वसई तालुक्यात वाºयासारखी पसरली. त्यानंतर बविआचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवक तेथे पोहोचून त्यांनी हंगामा सुरू केला. त्यामुळे वसई तालुक्यातील शेकडो शिवसैनिकही तेथे पोहोचले. पोलिसांना ही माहिती मिळताच मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचून त्यांनी शांततेचे आवाहन करत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली.
बविआच्या आरोपावरून पोलिसांनी आमदार रवींद्र फाटक यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यात ६४ हजारांची रोकड आढळली. भरारी पथकाने गाडी व पैसे जप्त करून तुळिंज पोलीस ठाण्यात रवींद्र फाटक यांच्याविरोधात जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
तुळिंज पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाºयांचे आरोप-प्रत्यारोप ऐकल्यानंतर दोघांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बविआचे महापौर रूपेश जाधव यांनी शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक, त्यांचा स्वीय सहायक अजिंक्य गावकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, जितेंद्र शिंदे, हेमंत पवार, उत्तम तावडे आणि २५ ते ३० कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर जमावबंदी, जाण्यास प्रतिबंध, असे वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तर फाटक यांचे स्वीय सहायक यांनी बविआचे महापौर रूपेश जाधव, उपमहापौर उमेश नाईक, नीलेश देशमुख, अतुल साळुंखे, भरत मकवाना, प्रशांत राऊत, भूपेंद्र पाटील आणि ५० ते ६० इतर कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर जमावबंदी, जाण्यास प्रतिबंध, गर्दी असे वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या वेळी बविआचे उमेदवार बळीराम जाधव हेही पोलीस ठाण्यात उपस्थित होते, तर पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंगही घटनास्थळी पोहोचले होते.
रात्री झालेल्या राड्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फाटक यांच्या गाडीतून मिळालेली रोख ६४ हजार रुपये आणि गाडी जप्त केली आहे. गाडी बॉण्डवर सोडून दिली आहे तर रक्कम जप्त करून त्यांच्यावर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. - डॅनियल बेन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणे
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसईतील गुंडगिरी संपवण्यासाठी दिलेल्या आवाहनाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यानेच त्यांच्याकडून जमाव जमवून हे दहशत निर्माण करण्याचे कृत्य केले गेले आहे. गाडी फोडण्याची गुंडगिरीची भाषा महापौर करीत आहेत त्यामुळे महापौरांसकट त्यांच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ठाकूरांच्या या गुंडगिरीला यापुढे शिवसैनिक जशास तसे उत्तर देतील. - रवींद्र फाटक, आमदार, शिवसेना