डहाणू/बोर्डी : डहाणू रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील वाहन पार्किंगच्या ठेकेदाराकडून वाहनधारकांविरोधात केल्या जात असलेल्या अरेरावीच्या आणि मनमानी कारभाराच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्याविरोधात या स्थानकाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर ठेकेदाराला समज देण्यात आली आहे.
डहाणू रोड स्थानक येथे पार्किंगकरिता २४ तासांकरिता ३० रुपये आकारणी दुचाकी मालकांकडून घेतली जाते. प्रतिदिन संख्येपेक्षा अधिक प्रमाणात वाहने येत असल्याने ठेकेदाराची मक्तेदारी आणि अरेरावीपणा वाढला आहे. वाहनधारकांसह हे कर्मचारी असभ्य वर्तन करणे, हुज्जत घालण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांच्याकडे तक्रार नोंदवहीची मागणी केली असता ती दिली जात नाही. तसेच पार्किंग कर्मचाºयांकडे गणवेश आणि ओळखपत्रही नाहीत. शिवाय ते परिसरात धूम्रपान करून थुंकत असल्याने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता व स्थानकाच्या सौंदर्याला बाधा पोहचते. याबाबत या रेल्वे स्थानकाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. त्यानंतर हा प्रकार न थांबल्यास प्रतिदिन दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.