- संजू पवार, विरार
रेल्वे अपघातात मृत झालेल्या बेवारस व्यक्तींच्या अंतिमसंंस्कारासाठी वसई रेल्वे पोलीसांना दरवर्षी लाखोंचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. प्रत्येक बेवारस पार्थिवाच्या अंतिम संंस्कारासाठी रेल्वेकडून एक हजार रुपये दिले जातात. प्रत्यक्षात खर्च २ हजार २५० रुपये येत असल्याने पोलिसांनी स्वत:च्या खिशातून प्रत्येक वेळी १ हजार २५० रुपे खर्च करावे लागत आहे. याप्रकरणी पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारकडून वाढीव रक्कम दिली जात नसल्याने रेल्वे पोलिसांना हा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. रेल्वेत अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. यातील अनेक मृत व्यक्तींच्या ओळख पटत नाही. त्यामुळे अशा बेवारस व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांकडे देण्यात आली आहे. रुग्णवाहिका आणि अंत्यविधीसाठीचा खर्च दरवर्षी वाढत असताना रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ होत नसल्याने पोलिसांवर आर्थिक ताण पडत आहे. वसई रेल्वे पोलिसांच्या हद्दीत वैतरणा ते मीरा रोडपर्यंतीची रेल्वे स्टेशन्स येतात. रूळ ओलांडणे,गाडीतून पडणे,नैसर्गिक मृत्यू,चढत असताना पडणे, टपावरून प्रवास करताना शॉक लागणे,गर्दीच्या वेळी लटकून प्रवास करताना पोलला धडकून पडणे यासारख्या घटनांमध्ये प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर बळी जात आहेत. यात वसई,नालासोपारा,आणि विरार रेल्वे स्थानकात सर्वाधिक अपघात घडत आहेत. २०१५ मध्ये मीरा रोड ते वैतरणा या दरम्यान ३५ कि.मी.च्या अंतरादरम्यान मिरारोड-२०,भायंदर-४३,नायगाव-११,वसई-५५,नालासोपारा-५७,विरार-७३,वैतरणा-४ असे एकूण मिळून २६४ जणांचे प्राण गेले आहेत. यामधील १९१ मृतांची ओळख पटली आहे. तर ७३ मृतांची ओळख पटली नाही.जानेवारी ते जुलै २०१६ मध्ये मिरारोड-१४,भायंदर-२३,नायगाव-७,वसई-१४,नालासोपारा-२३,विरार-४७,वैतरणा-३ असे मिळून एकूण १३१ जणांना आपला जीव गमवावा लागला. यातील ८७ मृतांची ओळख पटली आहे. तर ४४ मृतांची ओळखच्या पटली नाही. १९ महिन्यांच्या कालावधीत मृतांमध्ये ११७ बेवारस होते. त्यांच्या अंतिमसंस्कारासाठी पोलिसांना २ लाख ६३ हजार २५० रुपे खर्च करावे लागले. रेल्वेकडून फक्त १ लाख १७ हजार रुपे मदत दिली गेली. परिणामी पोलिसांना स्वत:च्या खिशातून तब्बल १ लाख ४६ हजार २५० रुपये खर्च करावे लागले आहेत. लोहमार्ग पोलीस ठाण्यांत आधीच मनुष्यबळ कमी आहे. कामाचा प्रचंड ताण ,अतिरिक्त कार्यभार असल्याने पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात वाढत्या अपघातामुळे बेवारस मृतांच्या अंतिमसंस्कारासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागत असल्याने पोलिसही त्रस्त झाले आहेत. बेवारस मृतांचे अंत्यविधी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद कमी आहे. त्यामुळे अंत्यविधी आणि रुग्णवाहिकेचा खर्च पोलिसांना करावा लागत आहे. या गंभीर विषयावर वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. - महेश बागवे, पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे, वसई.