पालघर/डहाणू : पश्चिम रेल्वेच्याडहाणू ते वाणगावदरम्यान ओव्हर हेड वायर मंगळवारी रात्री ११ च्या दरम्यान तुटल्याने पश्चिम रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक आठ ते दहा तास ठप्प झाली. सकाळी दहा वाजल्यानंतर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली. यादरम्यान १४ लोकल आणि मेमो गाड्या रद्द झाल्याने लांब पल्ल्याची सेवा विस्कळीत झाली.
दिल्लीकडे जाणारी व मुंबईकडे येणारी मेल, एक्स्प्रेस सेवा त्याचबरोबर डहाणू लोकल व मेमू गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. डहाणू ते विरार व चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या १४ लोकल लांब पल्ल्याच्या मेल व एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावत होत्या. सात वाजता पालघर स्थानकात येणारी बलसाड एक्स्प्रेस आठ वाजून ४८ मिनिटांनी स्थानकात आली. त्यामुळे अनेक जणांनी घरचा रस्ता धरला.
आधीच मेगाब्लॉक, त्यात नवी समस्या...
- आधीच मुंबईतील मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल सेवा रद्द केल्याने प्रवासी वैतागलेले असताना या घटनेने त्यांच्या समस्येत आणखी भर पडली.
- पालघरमधील शाळा, महाविद्यालयात परीक्षा असल्याने सफाळे, केळवे, बोईसर, डहाणू येथील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेवर पोहोचविण्यासाठी पालकांना खासगी गाड्या भाडेतत्त्वावर घ्याव्या लागल्या.
- महाविद्यालय प्रशासनाने झालेल्या अडचणीची माहिती मुंबई विद्यापीठाला दिल्यावर विद्यापीठाने विद्यार्थी परीक्षेला मुकू नये याची खबरदारी महाविद्यालयाने घ्याव्यात, अशा सूचना दिल्या. या घटनेमुळे ट्रेन व मेमू रद्द करण्यात आल्या होत्या.