वसई : नालासोपारा येथील एका तरूणाला रेल्वेच्या दरवाज्यात उभे राहून व रेल्वे ट्रॅकमध्ये स्टंट करणे व त्याचे व्हिडीओ इन्टाग्रामसारख्या सोशल साईटवर अपलोड करणे महाग पडले आहे. रेल्वे पोलिसांनी तपास करून त्याला न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी व ८०० रूपये दंड सुनावला आहे.
नालासोपारा पूर्व, मधील मरियम बिल्डिंग येथे राहणारा आवेद खान हा गेले काही दिवस रेल्वेच्या दरवाज्यात उभा राहून जीवघेणे स्टंट करत होता. तसेच नालासोपारा-विरार दरम्यान रेल्वे ट्रॅकवर स्टंट करतांना त्यानी त्याचे व्हिडीओ बनवून त्याने ते इंन्स्टाग्राम व इतर सोशल मिडीयावरून नॉटी खान या नावाने व्हायरल केले होते. याबाबत रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख गोरख नाथ मल्ल यांनी त्याचा तपास करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल मुकेश त्यागी व प्रकाश नौटीताल यांना आदेश दिले. या युवकाच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, तो कधी पालघर तर कधी इतर ठिकाणी असल्याचे सांगून रेल्वे पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पोलिसांनी त्याचे इतर व्हिडीओ तपासले असता नालासोपारा येथील ओळखीची एक इमारत त्यात दिसल्यानंतर त्याचा नालासोपारा परिसरात तपास सुरू केला होता. त्यानंतर तो राहत असलेल्या परिसराची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली. त्याचे नाव आवेद जावेद खान आहे. त्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने हे व्हिडीओ प्रसिद्धी व पैशासाठी केले असल्याचे सांगितले.त्याला रेल्वे कोर्टात उभे केले असता, १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी व ८०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या कारवाईमुळे अनेक स्टंट बहाद्दरांना चाप बसणार आहे.घरच्यांना नव्हते माहितविशेष म्हणजे आवेद हा असे धोकादायक स्टंट करीत असल्याचे त्याच्या आईला माहिती नव्हते. तीलाही या घटनेनंतर शॉक बसला असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख गोरख नाथ मल्ल यांनी सांगितले.