वसई - विरार शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील पापडखिंड धरण धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. लांब पल्ल्याचा प्रवास न करता अगदी विरार शहराला लागून असलेले धरण पाहण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे. मात्र या धबधब्यावर तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे डोंगरावरून दरड कोसळून मोठा जीवावर बेतणारा अपघात होण्याची भीती अन्य उपस्थित पर्यटकांकडूनच व्यक्त होत आहे.
पालघर, वसई हा पूर्व पश्चिम भाग बऱ्यापैकी निसर्गरम्य वातावरण, हिरवेगार डोंगर, पाण्याचे ओहोळ नानाविध कारणांनी उजवा आहे. यापैकी उत्तम असे हे ठिकाण म्हणून विरार पूर्वेकडील पापडखिंडकडे पाहिले जाते. हा परिसर दरवर्षी पावसाळ्यात व आताही पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. सुट्टीच्या दिवशी अथवा पावसामुळे रेल्वे सेवा बंद असल्यास या धबधब्यावर वसई-विरारकरांची मोठी गर्दी दिसून येते. मात्र आता काही तरूणांकडून याठिकाणी मद्यपान करून हुल्लडबाजी सुरू आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने डोंगरावरील दगडही कमकुवत होत असतात. त्यातच हे तरुण डोंगराच्या टोकापर्यंत टोळक्याने जातात. डोंगरावरून दरड कोसळण्याची घटना घडू शकण्याची भीती पर्यटक व्यक्त करत आहेत.
पापडखिंड धरणाच्या पाण्यात उतरू नये ?
पापडखिंड धरणाच्या पाण्यात गेल्या वर्षी अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असताना काळजी म्हणून यंदा या धरणाच्या पाण्यात कोणीही तरुण अथवा पर्यटक पोहण्यासाठी उतरू नये यासाठी वसई विरार महापालिकेने या भागात दोन सुरक्षारक्षक कार्यरत ठेवले आहेत. मात्र धबधब्यावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने तरुणांची हुल्लडबाजी सुरू आहे.