बोर्डी : अतिवृष्टी आणि सुमारे २५ दिवस पावसाने झोडपल्याने चिकूवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादक हवालदील बनला आहे. दरम्यान तालुका कृषी आणि कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी शिवारफेरीद्वारे बागांची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी तालुक्यातील कँक्र ाडी, चिंबावे, आगवन या गावांमधील १२ शेतकरयांच्या चिकू बागेला भेट देण्यात आली. या पथकात तालुका कृषी अधिकारी संतोष पवार, मंडळ कृषी अधिकारी अनिल नरगुलवार, कृषी पर्यवेक्षक सुनील बोरसे तसेच कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांचा समावेश होता. महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी व सचिव मिलिंद बाफना यांनी बागायतदारांच्यावतीने समस्या मांडल्या.सततच्या पावसाने चिकूमध्ये फायटोफ्थोरा नावाचा रोग वाढत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी बागेत ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीवर टाकावे. तसेच मॅनकोझेब व मेंटलेक्झिल या मिश्रित बुरशीनाशकाची फवारणी त्वरित चिकू झाडांवर करण्याचे आवाहन शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी केले. तालुक्यात सुमारे साडेतीनहजार हेक्टर या फळांच्या लागवडी खाली आहे. आगामी सहा महिन्यापर्यंत उत्पादन कमालीचे घटलेले असेल, त्यामुळे उत्पादकांना शासना तर्फे आर्थिक आधार देणे आवश्यक आहे. या फळांची तोडणी, वर्गवारी व पॅकेजिंग आणि ट्रान्स्पोर्ट या द्वारे उपजीविका करणारा स्थानिक मजुरांची संख्या अधिक आहे. त्यांच्या हाताला काम न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पाऊसपीडित चिकूची केली पाहणी; कृषी अधिकारी, शास्त्रज्ञांनी केले मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 4:24 AM