विरार - डोंगरपाडा तलावात मुसळधार पावसात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी हि दुर्दैवी घडली आहे. राकेश खोत (वय - 30) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.
मागील तीन दिवसांपासून वसई विरारमध्ये पावसाने थैमान घातले आहे. अशातच तालुक्यातील सर्व तलाव, नदी-नाले,धरणे ओसंडून वाहत असताना सर्वत्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या पथकाकडून सावधानतेचा इशारा देण्यात येऊन देखील विरार डोंगरपाडा तलावात पोहण्यासाठी राकेश व त्याचा एक मित्र मंगळवारी सकाळच्या सुमारास गेला होता. तिथे पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांपैकी एकजण तलावात बुडाला. त्यानंतर भयभीत झालेल्या मित्राने झाल्या घटनेची माहिती संबधितांना कळविली. त्यानंतर घटनास्थळी विरार पोलीस व पालिका अग्निशमन दल दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून राकेशचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.