नालासोपारा : पालघर आणि ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स फिटनेस असोसिएशन, रांगडे जिम्नॅशिअम आणि बहुजन विकास आघाडी (युवा आघाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपारा पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात नुकतीच राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा झाली होती. एकूण आठ वजनी गटात झालेल्या या स्पर्धेतील मानाचा ‘मॅन फिजिक्स पालघर श्री २०२०’ हा किताब बी फिटच्या राजे परमार याने पटकावला.‘मास्टर पालघर श्री’चा किताब भांबले जिमच्या चिराग पाटील याने जिंकला. दिव्यांग शरीरसौष्ठवपटूंच्या गटात योगेश मेहेर (टोटल फिटनेस) हा दिव्यांग ‘पालघर श्री’चा मानकरी ठरला. तर सुधाकर पवार (फिनिक्स जीम), मीता घुरघूस (भावर जिम), राहूल म्हात्रे (रांगडे जिम), विनायक जाधव (रॉयल फिटनेस), हर्षल वैती (सुनिल जिम), राजे परमार (बी फिटनेस), योगेश मेहेर (टोटल फिटनेस), चिराग पाटील (भांबले जिम) या शरीरसौष्ठवपटूंनी आपापल्या गटातील विजेतेपद पटकावले. अत्यंत चुरशीची ही स्पर्धा पाहण्यासाठी रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आ. क्षितीज ठाकूर, युवा आघाडी प्रमुख सिद्धार्थ ठाकूर, प्रभाग समिती सभापती निलेश देशमुख, माजी नगराध्यक्ष राजेश रोडे, युवाचे नालासोपारा अध्यक्ष पंकज देशमुख, माजी नगरसेवक अॅड.रमाकांत वाघचौडे, परेश पाटील, बन्सनारायण मिश्रा आदी मान्यवरांनी या स्पधेर्ला भेट दिली.आ. क्षितीज ठाकूर यांनी स्पर्धा आयोजक आणि स्पर्धकांचे कौतुक केले तसेच शुभेच्छाही दिल्या. युवा आघाडीचे पदाधिकारी किशोर काकडे, माजी नगरसेवक किरण काकडे यांनी पुढाकार घेऊन ही स्पर्धा भरविली होती.
राजे परमार ‘पालघर श्री’चा मानकरी, योगेश मेहेर दिव्यांगात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 11:53 PM