पालघर : दामू शिंगडा यानी २०१४ निवडणूकीत जी नामुष्की भोगायला लावली होती. तिचे उट्टे राजेंद्र गावित यांनी या पोटनिवडणुकीत १०० टक्के काढले.२०१४ निवडणुकीत काँग्रेसने राजेंद्र गावित यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यांच्या नावाचे बॅनरही संपूर्ण मतदारसंघात झळकले होते. त्यांनी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारीही केली होती. परंतु या मतदारसंघात काँग्रेसने मलाच उमेदवारी दिली पाहिजे. नाहीतर मी बंडखोर म्हणून अर्ज दाखल करेल अशी धमकी शिंगडा यांनी काँग्रेसश्रेष्ठींना दिली. त्यामुळे गावितांची उमेदवारी काँग्रेसने रद्द केली.रातोरात गावितांची सगळी होर्डींग्ज, बॅनर उतरवून घेतली गेली. राहुल गांधी यांनी सोनाळे येथे जी प्रचार सभा घेतली. त्यावेळीही त्यांनी यावर भाष्य केले नव्हते. या सगळ्या झामझाममध्ये पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच उभा राहिला नाही. परंतु प्रचार मात्र असा झाला की, बविआच्या उमेदवारासाठी काँग्रेसने हेतूत: उमेदवार उभा केला नाही.पालघर विधानसभा मतदार संघातही त्यांना दोनवेळा पराभव झाला. या सगळ्या प्रकरणात गावितांची जी मानहानी झाली तिचा वचपा काढण्याची संधी ते पाहत होते. ती त्यांना भाजपने आपल्यात घेऊन व पोटनिवडणूकीची उमेदवारी बहाल करून आणि ती जिंकून गावितांनी साधली. एवढेच नव्हे तर आता वनगा नसल्यामुळे २०१९ च्या पालघर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीची उमेदवारीही भाजपा त्यांनाच देईल. म्हणजे एकापरीने गावित हे डबल वचपा काढतील. कारण शिंगडा यांचे म्हणजेच काँग्रेसचे डिपॉझिट या पोटनिवडणुकीत जप्त झाले आहे. तसेच त्यांना पुढच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याचीही शक्यता त्यामुळे पूर्णपणे संपुष्टात आली आहे. म्हणूनच गावित सध्या अत्यंत खूष आहेत.
पक्ष बदलून राजेंद्र गावितांनी काढले उट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 12:56 AM