जव्हार/डहाणू : जगभरात कोरोना कोविड-१९ या व्हायरसने धुमाकूळ घातला असून याचा फटका धार्मिक स्थळांनाही बसला आहे. मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना लॉकडाउन काळात आल्याने संपूर्ण महिना रोजे (निर्जल उपवास), नमाज, विशेष तारावीहची नमाज व कुरआन पठन हे मस्जिदऐवजी पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी घरीच पठन करण्यात आले, तसेच महिन्याभराचे रोजे संपल्यावर ईदची सामूहिक नमाजही घरूनच पठण करण्यात आली.
मुस्लिम धर्मीयांमध्ये वर्षातून दोन ईद मनवल्या जातात. या दोन्ही ईद उत्सवाला मुस्लिम धर्मीयांत मोठा मान असून ही नमाज मुस्लिम धर्मीयांच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत बंधनकारक आहे, मात्र ईदची नमाज न झाल्याने मुस्लिम बांधव भावूक झाले होते. पालघर जिल्ह्यात ईद साधेपणाने साजरी करण्यात आली. मस्जिद तथा ईदगाह ओस पडल्या होत्या. लोकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करून आपापल्या घरातच नमाज पठन केली, तसेच ईद नमाज नंतर मुस्लिम बांधव गळा भेट घेतात.
एकमेकांना हात मिळवतात, मात्र कोरोनामुळे मुस्लिम बांधवांनी हातमिळवणी न करता, गळाभेट न घेता एकमेकांना शुभेच्छा दिल्या, तर काहींनी बाहेर न पडता मोबाईलद्वारे एकमेकांना शुभेच्छा संदेश दिले. दरम्यान, पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी मुस्लिम बांधवांना दूरध्वनीद्वारे ईदच्या शुभेच्छा दिल्या, तर पालघर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी डहाणू तालुक्यातील चिंचण येथे उपस्थित राहून तेथील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
च्मनोर : संपूर्ण रमजान महिन्यात घरी राहून मशिदीत न जाता पाच वेळची नमाजपठण केली केली. कुरआनचे वाचन करून रोजा ठेवून अल्लाची ईबादत करण्यात आली. सोमवारी टेन मनोर परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांनी कोरोनाच्या संकटावर मात करून सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून मशिदीत एकत्र न येता आपापल्या घरी नमाज अदा केली.
च्घरीच राहून आपल्या कुटुंबातील लहान मुले व इतर सदस्यांसोबत सण साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून मशिदीतील मौलाना, बांगी व तीन कमिटी सदस्य अशा पाच जणांनी मशिदीत नमाज अदा केली.