डहाणू : येथील नगराध्यक्ष मिहिर शाह यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ २४ जून रोजी पूर्ण होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नवीन नगराध्यक्षपदाची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया आजपासुन सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रमिला मनोज पाटील यांचा केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने डहाणूच्या नगराध्यक्षपदी त्यांची निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे. १५ जून रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकतीनंतर ती अधिकृतपणे जाहीर होणार आहे.डहाणू नगरपरिषदेत एकूण २३ नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ नगरसेवक आहे. त्यामुळे पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असून गेल्या अडीच वर्षापासून नगराध्यक्ष म्हणून मिहिर शाह तसेच उपनगराध्यक्ष राजेंद्र माच्छी कार्यरत आहेत. नगरपरिषद हद्दीतील प्रभाग एक मधून सन १९९२ पासून सातत्याने निवडून येणाऱ्या रमिला पाटील यांना आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत एकमताने नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षाकडे ओ.बी.सी. महिला उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवार रमिला पाटील बिनविरोध निवडून येणार आहेत. तर उपनगराध्यक्षपदासाठी राजेंद्र माच्छी, शशीकांत बारी, प्रदीप चाफेकर, रेणुका राकामुथा आदी नगरसेवक इच्छुक आहेत. (वार्ताहर)
डहाणू नगराध्यक्षपदी रमिला पाटील
By admin | Published: June 08, 2015 10:55 PM