पारोळ : ठाणे, मुंबई शहरांतून हद्दपार झालेल्या भंगार रिक्षा वसई तालुक्यात राजरोस प्रवासी वाहतूक करत आहेत. तसेच टाटा मॅजिकसुद्धा अवैध प्रवासी वाहतूक करत आहेत. त्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी वसई तालुका रिक्षाचालक-मालक सेनेने बंद पुकारला होता. या वेळी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी रिक्षाचालक-मालकांच्या संघटनेशी चर्चा केल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला.वसई पोलीस उपअधीक्षक नरसिंग भोसले, पोलीस निरीक्षक बाजीराव कळंत्रे, रवींद्र बडगुजर, वाहतूक पोलीस निरीक्षक पवार यांनी पुढाकार घेऊन अवैध प्रवासी वाहतूक व भंगार रिक्षांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. वसई तालुका रिक्षाचालक-मालक सेनेचे अध्यक्ष शिरीष चव्हाण, सचिव अरविंद जाधव, उपाध्यक्ष नितीन पाटील, हेमंत पवार, निलेश देवळेकर, गिरीश मांजरेकर, राकेश पाटील, नितीन चौधरी, दिलीप दळवी, सचिन सकपाळ, इंद्रकांत पाटील, सचिन गावकर यांच्यासह अनेक रिक्षाचालक-मालक उपस्थित होते. दरम्यान, नागरिकांनी व रिक्षाचालकांनी भंगार रिक्षा निदर्शनास आल्यास त्वरित स्थानिक पोलीस ठाणे, रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (वार्ताहर)
अवैध,भंगार रिक्षा, टाटा मॅजिकविरोधात रिक्षांचा बंद
By admin | Published: August 08, 2015 9:45 PM