- हुसेन मेमन, जव्हार
शहरातील गांधी चौक येथे असलेल्या महाराष्ट्र बॅँकेच्या तोकड्या जागेमुळे आदिवासी बांधवांना नेहमी बॅँकेच्या बाहेर भर उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. जव्हारमध्ये महाराष्ट्र बॅँकेची गांधी चौक येथे एकमेव शाखा असून ती खूपच तुटपुंज्या जागेत आहेत. शाखा सुरू झाली तेव्हा ग्राहकांचे प्रमाण अत्यल्प होते. आता त्यावेळच्या ग्राहकांत हजारोंनी वाढ झाली तसेच कामांचा व्यापही वाढला तरी शाखेची जागा काही प्रशस्त झालेली नाही. त्यामुळे दहा-बारा जरी ग्राहक बँकेत आले तरी लागलेली रांग रस्त्याबाहेर जाते. मग थंडी, वारा, पाऊस झेलत त्यांना प्रतीक्षा करावी लागते. या बॅँकेच्या बाहेर नेहमीच गर्दी झाली की, वाहातूककोंडी होते. एकीकडे ग्राहकांची रांग दुसरीकडे त्यांची वाहने आडवीतिडवी लागलेली हे चित्र सकाळी १० ते दुपारी ४.०० पर्यंत असते. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने उभे रहाणे कठीण जाते. त्यातच आदिवसी भाग असल्याने अनेक खातेदार अनवाणी पायाने येतात. त्यात वृद्ध आणि महिलांचे प्रमाण जास्त असते. त्यांना वरून उन्हाचा तडाखा आणि पाय पोळणे असा दुहेरी मारा सोसावा लागतो आहे. विशेष म्हणजे हे सर्व ग्राहके रोजगार हमीची किरकोळ रक्कम म्हणेज ३०० रूपये ते १२०० रूपये काढणारे आहेत. त्यामुळे बॅँकेने ग्राहकांची सोय करणे गरजेचे आहे. जव्हार तालुक्यातील अनेक गाव पाड्यातील आदिवासी बॅँकेच्या व्यवहारासाठी शहरात येत असतात. मात्र, सकाळी येऊन सुद्धा अपुऱ्या जागेमुळे त्यांना ताटकळत बसावे लागत असल्याचा त्रागा अनेकांनी लोकमतकडे बोलून दाखविला.
आरबीआयची गाइडलाइन काय सांगते?जागा अपुरी असतांना बॅँकेची क्षमता बघता ग्राहकांचे अतिरीक्त खाते का उघडून घेतले? जर खाते उघडले तर त्यांना व्यवहार होईपर्यत बसण्याची, पाण्याची व आर.बी.आय.च्या नियमानुसार बॅँकेत दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा का दिल्या जात नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
आम्ही सकाळी ९.०० वाजेपासून रांगेत उभे राहतो. दुपारचा १ वाजले तरी आमचा नंबर लागत नाही. माझे रोजगार हमीचे ५०० रूपये काढण्याकरीता मी बॅँकेत आलेलो आहे. मात्र आमच्या कष्टाच्या फक्त ५०० रूपयांकरीता आम्हाला याचका सारखे ताटकळत राहवे लागते. - वसंत हिलीम, हातेरी (बोचरीपाडा)आम्ही प्रशस्त जागा मिळविण्याकरीता जाहिरात प्रसिध्द केलेली आह. झोनल विभागाकडून त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. - रंजना भोईर, व्यवस्थापक, बॅँक आॅफ महाराष्ट्र (जव्हार)आम्ही बॅँकेचे ग्राहक आहोत भिकारी नाही, मात्र शासनाच्या आडमुठ्या नियमामुळे आमचे कष्टाचे पैसे काढण्याकरीता आम्हाला उन्हा तान्हात ताटकळत उभे रहावे लागते. दिवसाची रोजी वाया घालवावी लागते. बॅँकेने आमची बसण्याची सोय व उन्हापासून वाचण्याकरीता बॅँकेच्या बाहेर मंडपाची सोय करणे गरचे आहे. - भरत सोनू गवते, मजुर ग्राहक (हातेरी)