लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - लग्नाचे आमिष दाखवून ३२ वर्षीय तरुणीवर सतत बलात्कार करत तिची २८ लाख रुपयांना फसवणूक केल्या प्रकरणी मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे .
पीडित तरुणी ही वसई भागात राहणारी आहे . ती मीरारोड मध्ये कामाला असून त्याच ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीशी तिची ओळख झाली . आरोपीने तरुणीस लग्न करणार असे सांगितले होते . लग्नाचे आमिष दाखवत त्याने इच्छे विरुद्ध तिच्यावर वारंवार बलात्कार केला . आरोपीने फिर्यादी कडून घेतलेले २८ लाख रुपये सुद्धा परत न करता फसवणूक केली .
आरोपीने पैसे परत केले नाहीच शिवाय लग्न करण्यास नकार देत बदनामी करेन , आयुष्य उध्वस्त करेन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे . पीडितेच्या फिर्यादी नंतर नया नगर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे .