वसई : महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाकडून रेशनकार्डांचे संगणीकरण करण्याची मोहिम राबविली जात आहे. त्या अनुषंगाने वसई तालुक्यातील रेशनकार्ड धारकांच्या शिधा पत्रिकांची (रेशनकार्ड) संगणीकृत नोंदणी केली जात आहे. मात्र वसई तालुक्यातील कित्येक ग्राहकांनी अर्ज भरुनही अद्याप त्यांची आॅनलाईन रेशनकार्डे कार्यान्वित झालेली नसल्याने त्यांना मागील तीन ते चार महिन्यांपासून धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर रुपेश जाधव यांनी नुकतीच तहसिलदारांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. यावेळी जवळपास चारशे महिला उपस्थित होत्या. त्यांनी गोंधळाबाबत रोष व्यक्त केला.कार्डांचे संगणकीकरण करु न ती आॅनलाईन करण्याची प्रक्रीया अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने कित्येक रेशनकार्ड धारकांची नावे अद्याप संगणकात अपडेट झालेली नाहीत. दुसरीकडे संगणक यंत्रणेवर अपडेट झालेल्या कार्डधारकांनाच धान्य वितरित केले जात असल्याने शेकडो कार्डधारक गेल्या तीन ते चार महिन्यांपासून धान्यापासून वंचित आहेत. यामुळे आर्थिक दुर्बल असलेल्या कार्डधारकांना नाईलाजास्तव चढ्या भावाने बाजारातून धान्य खरेदी करावे लागत आहे. या संदर्भात महापौर रुपेश जाधव यांनी नुकतीच वसई तहसिलदारांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. तसेच नागरीकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करुन हे काम जलदगतीने करावे अशी मागणी केली. यासह नालासोपारातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आचोळे भागासाठी स्वतंत्र शिधा वाटप केंद्र सुरु करावे, काही शिधावाटपात सावळागोंधळ सुरु असून त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली. नगरसेवक वैभव पाटील यांनीही यावेळी नागरीकांना होणारी गैरसोय दुर करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला द्यावेत अशी मागणी केली. तर धान्य मिळण्याबाबत नागरीकांची गैरसोय होणार नाही असे आश्वासन तहसिलदारांनी दिले. महिला बचत गटाच्या केंद्राबाबत ग्राहकांच्या तक्रारींची, चौकशी करून कारवाई करू, असे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. वसईत धान्याचा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा आहे. काही बचत गटाच्या शिधावाटप केंद्राबाबत ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ही दुकाने महिनाभर खुली राहणे आवश्यक आहे; परंतु जेव्हा धान्य येते तेंव्हा त्याची माहिती नागरिकांना मिळत नाही आणि अवघ्या दोन-तीन तासांत धान्य संपल्याचे जाहीर केले जाते. मात्र हे धान्य काळ्याबाजारात विकले जात असल्याचा व पुरवठा अधिकारी आणि दुकानदारांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. काही दुकानदारांकडे एकापेक्षा अधिक परवाने देण्यात आलेले आहे. वसईत सध्या ४५ महिला बचत गटांना रेशेनिंगचे परवाने देण्यात आले आहेत.विजेचीही चोरीवटार येथील एकाच घरात दोन परवाने दिलेले आहेत. महिला बचत गटाच्या एका महिलेच्या नावावर व पतीच्या नावावर दुसरे असे दोन परवाने घेतले.या महिला बचत गटाचे शिधावाटप केंद्र आदिवासी पाड्यात असून आकोडा टाकून चोरीची वीजवापरली जात असल्याचे समोर आले आहे. दिवाळीत ३०० किलो तूरडाळ उपलब्ध असतांनाही वेळेत तिचे वितरण या केंद्रातून करण्यात आले नसल्याचे समजते.नियमानुसार पुरवठा होत असल्याचा दावा वसईचे पुरवठा अधिकारी प्रदीप मुकणे यांनी केला आहे. जर कडधान्याचा पुरवठा होऊनही महिला बचत गटाच्या केंद्रात धान्याचे वाटप होत नसेल तर त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
वसईत रेशनकार्डांचे संगणीकरण करण्याची मोहिमेमुळे रेशनिंगचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 1:35 AM