नालासोपारा : वसईतील होळी गावातील राऊत कुटुंबियांच्या वाड्याला १३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. वसईतील आणि देशातील अनेक घडामोडींना साक्षी असलेला हा वाडा अजूनही दिमाखात उभा आहे. आणि १०० वर्षाहुनही अधिक काळ उलटूनही या वाड्यात प्रतिवर्षी नवरात्रौत्सव पारंपारिक पद्धतीने जल्लौषपूर्ण वातावरणात साजरा केला जात असतो.सद्या सगळीकडे शारदीय नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू असलेली पहायला मिळत आहे.वसईतील होळी येथील राऊत कुटुंबीयांच्या घरातही नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.मात्र या नवरात्रौत्सवास तब्बल शंभर वर्षाहूनही अधिक परंपरा असल्याचे घरातील सदस्य आशय राऊत यांनी सांगितले.वंशवेल वाढू लागल्यानंतर आता राऊत कुटुंबातील सदस्यांनी वेगवेगळी घरे बांधली आहेत.मात्र पूर्वीपासून राऊत कुटुंबिय दरवर्षी गणेशोत्सव , नवरात्रौत्सव ,दिवाळी अशा सणांना या वाड्यात एकत्र येत असतात.मोठ्या उत्साहात व जल्लौषपुर्ण वातावरणात दुर्गेची आराधना राऊत कुटूंबीय एकत्ररीत्या करीत असतात.राऊत कुटूंबीयांची खाजगी मालमत्ता असलेला हा पुरातन असलेला वाडा जतन करण्याचा संकल्प कुटुंबियांनी केला आहे.या घराण्यातील भास्कर रघुनाथ राऊत यांनी या वाड्याचा तसेच कुटुंबाचा एक इतिहास लिहिला असून त्यावरून पुरावे उपलब्ध आहेत. १८८३ साली शिवा राऊत यांनी हा वाडा बांधला. आज १३५ वर्ष वाड्याला पूर्ण झाली तरी वाडा जुन्या बांधकाम पद्धती व इतिहासाची साक्ष देत आपल्या जागेवर उभा आहे. या वाड्याने स्वातंत्र्यपूर्व आणि आतापर्यंतचा काळ पहिला आहे. राऊत कुटुंबियांचा आधीपासूनच सामाजिक पिंड आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांचे पाय या वाड्याला लागले आहेत. त्याकाळी दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले भायजी जगू राऊत हे याच घरातील होत.या वाड्यात येणारा प्रत्येक जण वाड्याच्या प्रेमात पडतो. इंग्रजांची राजवटीत एका इंग्रज अधिकाऱ्याने या वाड्याला भेट दिली होती. राऊत घराण्याच्या इतिहासात त्याची नोंद आहे. राऊत कुटुंब जवळपास १६० जणांचे आहे.>राऊत कुटुंबातील प्रत्येक सदस्य दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व दिवाळी सणानिमीत्त एकत्र येत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठ्या उत्साहात सामिल होत असतात.हा वाडा आमचा श्वास आहे.-आशय राऊत,राऊत कुटुंबातील सदस्य
वसईतील राऊत वाड्याला झालीत १३५ वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:06 AM