पालघर : अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘हक्का कडून सक्षमते कडे’ या कार्यक्र मांतर्गत जिल्ह्यातील ३ हजार १८५ गावातून १ हजार ९८४ वैयक्तिक वनहक्क दाव्यांना मान्यता देण्यात आली.या कार्यक्र मांतर्गत जिल्हास्तरीय वनहक्क समितीची बैठक महसूल भवन येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यासाठी जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे सचिव, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकूणे, उप वनसंरक्षक डहाणू, एन. एस. लडकत, उप वनसंरक्षक, जव्हार अमितकुमार मिश्रा, तसेच समितीचे अशासकीय सदस्य सुरेश कोरडा, हेमलता राठोड, जिल्हा परिषद सदस्य आदींसह जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा समन्वयक, जिल्हा व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, वनहक्क सहाय्यक हे देखील उपस्थित होते.या बैठकीत एकूण ३ हजार १८५ गावातील १ हजार ९४८ वैयक्तीक वनहक्क दाव्यांना मान्यता देण्यांत आलेली आहे. तसेच १ हजार २३७ वैयक्तिक दाव्यांत कमी क्षेत्र मंजुर करणे, जीपीएस नकाशात झाडे दिसत असताना लागवड असल्याचे नमुद केलेले असणे, इ. विविध कारणामुळे सदर दावे फेर चौकशी कामी उपविभागस्तरीय समितीकडे पाठविण्यांत आलेले आहेत. तथापी वरीलपैकी एकही दावा जिल्हास्तरीय समितीकडून नामंजुर करण्यांत आलेला नाही.‘हक्कांकडून सक्षमतेकडे’ अंतर्गतपालघर जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार वनखात्याचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, यांचे सोबत वेळोवेळी बैठका व चर्चा झाल्या. तसेच कामाबाबत प्रत्यक्षात जिल्हाधिकारी यांचेसह सर्व अधिकारी यांनी गावस्तरावर मुक्काम करून करावयाच्या कार्यपध्दतीचे प्रात्यक्षिक केले. तसेच, या क्षेत्रात काम करणारे विविध सामाजिक संस्था, अशासकिय संस्था यांचे पदाधिकारी यांचे समवेत कार्यशाळा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
वैयक्तिक वनहक्कांच्या १९४८दाव्यांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 2:18 AM