वसई : वसई विरार परिसरात सध्या अडीचशेहून अधिक टँकर पाणी पुरवठा करीत आहेत. त्यातील शंभर टँकर विना परवाना असून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे नालासोपारा शहर सरचिटणीस मनोज बारोट यांनी केली आहे.वसई विरार परिसरात अद्यापही पाण्याची टंचाई असल्याने टँकरचा धंदा तेजीत आहे. शुद्धीकरणाची कोणतीही प्रक्रिया न करताच टँकर लॉबी तलाव, विहीरी, बोअरवेलमधील दूषित पाणी पुरवठा करीत आहेत. विरार येथील पापडखिंड धरणाच्या परिसरात बेकायदेशीरपणे बोअरवेल मारून पाणी चोरले जात आहे. तर नालासोपारा शहरात टाकी पाडा आणि लोढा नगर येथील विहीरीतील दूषित पाणी पिण्यासाठी पुरवले जात आहे. पावसाळ््यात तर टँकरलॉबी अक्षरश: डबक्यातील पाणी पुरवत असल्याचा वृत्त लोकमतने पुराव्यानिशी दिले होते. टँकर लॉबीवर कुणाचाही अंकुश नसल्याने दूषित पाणी पुरवठा करून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. दुसरीकडे, टँकरमुळे काही जणांचे प्राण गेले आहेत. गेल्या महिन्यात निशात घाडीचा टँकरखाली सापडून मृत्यू झाला होता. तर गेल्याच आठवड्यात टँकरखाली सापडून नऊ वर्षाच्या मुलाला आपला पाय गमवावा लागला आहे. टँकरवाल्यांविरोधात कडक कारवाई होत नसल्याने मनमानी सुरुच राहिला आहे.
वसईत विनापरवाना पाण्याचे १०० टँकर सुरू, कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 4:59 AM