- अनिरुद्ध पाटील डहाणू/बोर्डी : ‘भेट कलम’ हा कलमांचा एक प्रकार असून त्याद्वारे झाडांचे आयुष्य वाढविण्यासह फळांचा दर्जा तसेच उत्पादन वाढविता येते. शिवाय यामुळे अॅग्रो टुरिझमचा प्रसार होण्यास मदत होणार आहे.तालुक्यातील कोसबाड नजीकच्या झारली या आदिवासी पाड्यावर नारायण पटलारी यांनी आपल्या शेतातील आंबा कलमांवर या पद्धतीचे प्रयोग केले आहेत. त्यामुळे झाडांचे विविध आकार पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. केवळ सुशोभीकरणच नव्हे तर कलमांना दीर्घायुषी करण्यासह त्याचे अनेक फायदे असल्याचे पटलारी सांगतात. आंबा कलमाची लागवड केल्यानंतर त्याचे सोटमुळ कमकुवत होते. यासाठी कलमाच्या भोवती चार ते पाच कोय लावून साधारण वर्षभराचे रोप झाले की जोड कलम करून त्या मुख्य कलमाला चारही रोपांचा एकत्रित आधार द्यायचा. यामुळे अन्नद्रव्य मिळून कलमाची वाढ जोमाने होते. महत्त्वाचे म्हणजे, मजबुती वाढून झाड उन्मळून पडण्याचा धोका टळतो. उत्पादन क्षमता वाढून फळांचा आकारही मोठा होण्यासह एकाच झाडापासून विविध जातींची कलमे करून फळे मिळतात. पाण्याची कमतरता असलेल्या भागात ही पद्धत लाभदायी आहे.>‘कलमाची साल आवश्यकतेनुसार कापून नवीन रोपाचा शेंडा जोडून त्यावर ग्रीस लावल्याने, त्या भागाला पाणी लागणार नाही. प्लास्टिक पट्टी बांधावी. साधारणत: दोन महिन्यात कलम जोडला जातो. पावसाळ्यात आर्द्रता असताना हा कलम करता येतो.’- प्रा.उत्तम सहाणे (शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र)>‘या पद्धतीने कलम बांधणारे अनेक आदिवासी कारागीर आहेत. या पद्धतीचा प्रचार-प्रसार झाल्यास त्यांच्या हाताला रोजगार मिळेलच. शिवाय आहेत त्या वृक्षांचे जतन करता येईल.’- नारायण पटलारी (कलम बांधणारा कारागीर)
भेट कलमाद्वारे झाडांना नवसंजीवनी, उत्पादन वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:27 AM