- रविंद्र साळवे
मोखाडा : मागेल त्याला काम आणि दाम या तत्वावर कार्यरत असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आठ महिन्याचा कालावधी उलटूनही केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने आज सकाळ पासून बेरिस्ते ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांनी मोखाडा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारा समोर उपोषण सुरु केलं आहे. तालुक्यातील बेरिस्ते ओसरविरा या ग्रुप ग्रामपंचायतमधील घोडीचा पाडा पासोडीपाडा मुकुनपाडा आंबेचापाडा ओसरविरा गारमाळ बाला पाडा अशा नऊ पाड्या मधील 150 ते 200 मजुरांनी एप्रिल महिन्यात रस्त्याचे काम केले आहे. परंतु आठ महिन्याचा कालावधी उलटूनही या मजुरांना आपल्या कामांचा मोबदला मिळालेला नाही, यामुळे या आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून नेहमीच पैश्याची चणचण भासणाऱ्या आदिवासीना पदरमोड करून वारंवार तालुक्याला हेलपाटे मारूनदेखील सरकारी बाबूंच्या अनावस्थेमुळे त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळालेला नाही यामुळे असंतोष निर्माण होऊन सात दिवसाच्या आत आम्हाला आमच्या कामाचा मोबदला द्या अन्यथा उपोषणाचा इशारा तक्रारी अर्जाद्वारे 20 दिवसापूर्वी दिला होता परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने सोमवार दिनांक 18 रोजी सकाळ पासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे .